थोर समाजसुधारक, विचारवंत, आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे अफाट कार्य उभे करणारऱ्या कवी मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे ह्यांचा आज जन्मदिवस .विदर्भातील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ साली त्यांचा जन्म झाला. बी. ए., एल. एल. बी. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी वकिली केली. पण १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सहवासात आले आणि त्यानंतर कुष्ठरोग/महारोग सेवा समितीची त्यांनी स्थापना केली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथे कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवना’ची स्थापना केली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.
बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांवर केवळ वैद्यकीय उपचार करण्याइतकचं मर्यादित काम न करता कुष्ठरोग्यांना मानसिक आधार मिळवून देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. त्यातून त्यांच्या पुनर्वसनाचं कार्य घडवून आणलं. त्यामुळे कुष्ठरोगी स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि त्यांच्याकडे बघण्याचा समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडून आला.
बाबा आमटे हे एक कोमल मनाचे कवीही होते. त्यांचे काही कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यात समाजभानाचे दर्शन घडते. ‘ज्वाला आणि फुले’, ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन’, ‘माती जागवील त्याला मत’, ‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘करुणेचा कलाम’ हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
" शृंखला पायी असू दे , मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही ही संपूर्ण कविता ह्या प्रमाणे.
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणाऱ्या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे
वाडगे घेवून हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करूणा जगाची, लांबोनी चतकोर झाली
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई…
त्या तिथे वळणावरती पण वेळ क्षण एक आला
एकटे एकत्र आले आणि हा जत्था निघाला
घोर रात्री श्वापदांच्या, माजलेले रान होते
पांगल्याना पत्थरांचे ते खडे आव्हान होते
टाकलेली माणसे अन त्यक्त ती लाचारी माती
त्यातुनी आले हृतुंचे भाग्य या घायाळ हाती
पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले
आसवे अन घाम यांचा आगळा शृंगार चाले
वेदनेच्या गर्द राणी गर्जली आनंद द्वाही…
कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा
माणसांसाठी उद्याच्या, येथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्तगंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळीत ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली हि सर्व निधाळाची कमाई…
- बाबा आमटे
( ज्वाला आणि फुले)