कवी ग्रेस ह्यांच्या " ओळख " ह्या कवितेतील हे शेवटचे कडवे.. पूर्ण कविता आणि त्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ह्याप्रमाणे ...
ओळख :ग्रेसने या कवितेत वर्तमान आणि भूतकाळाला जोडणाऱ्या आठवणी किती मार्मिक असतात हे दाखविले आहे. त्यांना उन्हाळ्यातील एका सरत्या रात्रीत एका वृद्ध बाईच्या ओवीची आठवण आली आहे.'ओठांची मिथिला ल्याया' या ओळींची पृष्ठभूमी महाभारतातल्या एका कथेत आहे. सीतेचे वडील जनक हे प्राचीन मिथिला नगरीचे राजे होते. मिथिला नगरीत एकदा भयंकर आग लागून ती नष्ट झाली होती. ग्रेसने या अग्निदाहाचा संदर्भ अतोनात उष्म्यासाठी दिला आहे.
मालविल्या सांज-दिव्यांची
तम मार्गावरती खंत
वृद्धेच्या ओवी मधला
उरी दाटून ये भगवंत
तम मार्गावरती खंत
वृद्धेच्या ओवी मधला
उरी दाटून ये भगवंत
पानाच्या जाळीमधले
वाऱ्याचे कुंडल डुलते
ओठांची मिथिला ल्याया
पदरातून नभ व्याकुळते
वाऱ्याचे कुंडल डुलते
ओठांची मिथिला ल्याया
पदरातून नभ व्याकुळते
तुटलेली ओळख विणता
प्राणांची फुटते वाणी
पायातून माझ्या फिरतो
अवकाश निळा अनवाणी
प्राणांची फुटते वाणी
पायातून माझ्या फिरतो
अवकाश निळा अनवाणी
मी बघत आहे की आकाशातील तारे अस्त होऊन अंधार झाला आहे आहेत आणि मला कधीतरी रात्रीच्या अंतिम प्रहरात जात्यावर बसून देवाच्या प्रेमाने दाटून आलेल्या वृद्ध स्त्रीचे ओवी गाणे आठवत आहे. या वेळी वृक्षावरून खाली गळलेली जाळीदार सुकलेली पाने वार्यामुळे कुंडलासारखी निरंतर इकडून तिकडे होत आहेत. अत्यधिक उष्म्यामुळे ओठ शुष्क झाले आहेत पण ती ओवी गाणारी वृद्ध बाई जणू आपला पदर हलवून मला शांती देण्याचा प्रयत्न करत आहे .जुन्या आठवणीना उजाळा मिळाल्यावर माणूस किती हळवा होऊन जातो. अशा आठवणी आल्यावर तो स्वतःचे दुक्ख त्यांच्यात विसरून भूतकालात फिरतच राहतो
मला वाटते ग्रेस यांच्या कवितांचा कधीच कोणी अर्थ लावू नये! त्यांची कविता समजण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे. लौकिक अर्थाच्या मागे लागल्याने त्यांच्या कवितेतले अलौकिक, अमूर्त सौंदर्य हरवून जाते..जे त्यांच्या कवितेचा आत्मा आहे!
ReplyDelete