आपल्या साहित्याने रसिकांना भरभरून आनंद देणारे आनंद यात्री कवी बा. भ. बोरकर( बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांचा आज जन्मदिवस .
३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यामधील कुडचुडे या गावी जन्मलेल्या बोरकरांचे बरेचसे शिक्षण पोर्तुगीजमधे झाले. पोर्तुगीज टीचर्स ट्रेनिंग प्रमाणपत्र परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. मॅट्रिकनंतर खर्च झेपणार नाही म्हणून त्यांना शिक्षण सोडावे लागले. टीचर्स डिप्लोमा घेतल्यामुळे त्यांना पोर्तुगीज मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. नंतरच्या काळात आमचा गोमंतक, पोर्जेचो आवाज या वृत्तपत्रांचे ते संपादक होते. पुढे पुणे-पणजी आकाशवाणीवर त्यांची नियुक्ती झाली. आकाशवाणीमध्येच १९७० पर्यंत काम करून ते निवृत्त झाले.
बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरणाचा , गोवा , कोकणातील निसर्गाचा झालेला खोल परिणाम त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो. निसर्ग सौन्दर्याबरोबरच , स्त्री सौंदर्य , प्रेमभावना हेदेखील त्यांच्या कवितांचे प्रमुख विषय . नादमय व छंदोबद्ध रचनेमुळे त्यांच्या कवितांचा मराठी रसिकांवरअसलेला पगडा आजही कायम आहे. ११ काव्यसंग्रह, ४ कादंबऱ्या , २ कथासंग्रह,६ अनुवाद आणि कोकणी साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या आनंदभैरवी, चित्रवीणा, गितार, आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. १९६७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आले
A calligraphic tribute to Poet Ba Bh Borkar