Tuesday, 24 December 2013

Calligraphy-24.12.2013


ज्येष्ठ कवी शंकर रामाणी ह्यांची गीत रचना . 

रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी
उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी

पुसणार तू कुणाला मिटलीत सर्द दारे
धारांत नाहणारी धरतीच गे ईमानी

पानातुनी मनाच्या माझेच हे शहारे
मातीत मातलेला आवेगही तुफानी

सोसून सोसवेना गात्री अलक्ष धारा
प्राशून पाप येते डोळ्यांत मूढ पाणी

प्राणांत हूड वारे हलतेच झाड आहे
त्यानीच ढाळलेली तू माळिली विराणी

A calligraphic tribute to Poet Shankar Ramani. please visit to www.calligraphicexpressions.blogspot.com to see previous poems 

Thursday, 19 December 2013

Calligraphy-19.12.2013



ज्येष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांची रचना . 

ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार
नादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकार

सूर स्पर्श सूर श्रवण
स्वर गंधित आश्वासन
तिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार

सूर साध्य स्वर साधन
सूर रूप स्वर दर्पण
स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार

सप्तसूर स्वर्ग सात
स्वर सांत्वन वेदनांत
सुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार

A calligraphic tribute to Poet Sudheer Moghe

Saturday, 7 December 2013

Calligraphy-07.12.2013


ज्येष्ठ कवी प्रा. फकीरराव मुंजाजी शिंदे अर्थात फ मुं शिंदे ह्यांच्या " फकिराचे अभंग" 
ह्या काव्यसंग्रहातील ही अभंगवाणी 

मनाशीच जो जो करावा विचार 
वारावर वार  चालतात 
आपलीच इजा घ्यावी दुखवून 
जखम उतून चरताना 
आपलेच कसे काळीज दुखते 
सुगीही सुकते हंगामात 
खोल समुद्रात उंच माळावर 
जीव सुळावर चढलेला 
का ही  तडफड माझ्याच अंतरी 
दूर दिगंतरी निनादत 
घडले तसेच आताही घडते 
त्याचे का कढ ते उसळती 
कितीही वाटले कापावीच नाळ 
तेवढ्यात बाळ हुंकारते 
चाललो सोसत जन्माच्या वेदना 
काय आता कुणा निरूपावे  

Wednesday, 4 December 2013

Calligraphy-04.12.2013


कवयित्री क्रांति साडेकर ह्यांची " अलख" ही कविता . वृत्तबद्ध कवितांचा आग्रह आणि सखोल चिंतनातून कविता लिहिणाऱ्या या भाव कवयित्रीचे 'असेही तसेही ' आणि 'अग्निसखा ' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत 
अलख 

हा अलख कुणा जोग्याचा 
ही गहन कुणाची वाणी?
प्राणांच्या कंठी रुजली 
संध्यापर्वाची गाणी 

झाकोळुन नभ गंगेच्या 
पाण्यात उतरले थोडे 
क्षितिजाच्या पार निघाले 
अन् सूर्यरथाचे घोडे 

त्या मूक, उदास जलावर
धूसर वलये वाटोळी 
रेखाटत बसली कुठल्या 
कवितेच्या अनवट ओळी?

ज्या सांद्र वनातुन घुमले
अस्वस्थ क्षणांचे पावे 
ते वन सोडून निघाले 
अज्ञात दिशेला रावे 

ढळत्या सांजेच्या पदरी 
अस्फुटसा लुकलुक तारा
परतून चालला जोगी 
अन् अलख घुमवितो वारा 

क्रांति

A calligraphic tribute to Poetess Kranti Sadekar