Monday, 31 March 2014
Wednesday, 26 March 2014
Calligraphy-26.03.2014
कवी ग्रेस ह्यांच्या स्मरणार्थ
नुकताच पॉप्युलर ने प्रकाशित केलेल्या , त्यांच्या बाई! जोगियापुरुष ह्या काव्य संग्रहातील कविता …
जेव्हा भगवे वस्त्र परिधान केलेला, कपटी रावण , भिक्षा मागण्यासाठी सीतेच्या दारी आला , त्या क्षणी सीतेच्या मनातल्या भावना व्यक्त करणारी ही कविता…
बाई! जोगियापुरुष
आला भिक्षेसाठी दारी
त्याचा कमंडलू काळा
हाती सोनियाची झारी
बाई! जोगियापुरुष
तीक्ष्ण देई ललकारी
जशी अशुभाची वार्ता
येई मुलीच्या माहेरी
बाई! जोगियापुरुष
घट्ट आवळतो जटा
त्याच्या भयात निमाल्या
साऱ्या वनवासी वाटा …
बाई! जोगियापुरुष
खाचा डोळियात ठेवी
असे एखादेच जाते
ज्याला सोसवेना ओवी …
बाई! जोगियापुरुष
सांगे हरिणाला हळू ;
नको भुलून फोडूस
विध्द सौमित्राचा गळू
बाई! जोगियापुरुष
देई सत्याला मुलामा ;
कशी उजळेल सीता
सूर्यचंद्राचा काळिमा
(ऋणनिर्देश: श्री सुभाष अवचट सर )
A calligraphic tribute to Poet Grace
Tuesday, 18 March 2014
Calligraphy-18.03.2014
मोघे सर,
तसे गेल्या दोन वर्षात आपण कायमच भेटत गेलो… virtually …
poetsudheer@yahoo.com वरून येणाऱ्या ई मेल्स मधुन… प्रोत्साहन देणारे शब्दातून...
आपल्या काव्यसंग्रहातील, कवितांची विरचना, आपण निश्चित कांही विचाराने केली होती आणि ती तू तुझ्या अक्षरातून सांभाळलीस ह्या कौतुकाने माझ्या घरी सही करून पाठवलेल्या काव्यसंग्रहातून …
कुमार गोखले ह्यांच्याशी फोनवर बोलता बोलता , मी तिथे आहे हे कळल्यावर भेटूया रे …. आपण ह्या आधी कधी भेटलोय ना ..अशा संवादातून
होय सर ,,,,, आपण भेटलो होतो… १९९० साली …. कर्वे रोडवरच्या आपल्या ऑफिस मध्ये ,, सांगलीहून कुणीतरी एक मुलगा ,आपले अक्षर घेण्यासाठी आलाय हे कळल्यावर , आपला गाववाला आपल्याला भेटायला आला ह्याचे अप्रूप जास्त … पुराणातल्या गोष्टीत देव प्रसन्न झाल्यावर भक्त काहीतरी मागतो , मग परत देव त्यावर हसून दुसरे काहीतरी माग असे म्हणतो अशी कुठलीतरी गोष्ट ऐकलेली … तसच काहीसे …. बोल ,तुझ्या ह्या अक्षर संग्रहासाठी काय लिहून देवू …. असे म्हटल्यावर माझ्याच मनात गोंधळ … काय मागावे …इतकी गीते … इतक्या कविता … मी म्हटलं … सर, सखी मंद झाल्या ?…. हसत हसत नकार देत म्हणालात … दुसरे काहीतरी लिहितो … परिचीत शब्द नकोत … वेगळ काहीतरी लिहितो…
परवा वैकुंठ मध्ये अंतिम दर्शन घेताना , जवळ सुरु असलेले ऋग्वेदातील … भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक कानी पडत होते … मला मात्र आठवत राहिलात ते तुम्ही २४ वर्षापूर्वी माझ्यासाठी लिहून दिलेल्या कवितेतून ...
ह्या नि:शब्दांच्या आड
कुजिते कसली?
पानांच्या रेषांतुनी
भाकिते कुठली ?
होशील एकटा तू देहाच्या पैल
सोबतीस तेथे
कविता फक्त असेल
A calligraphic tribute to Poet Sudheer Moghe
Saturday, 15 March 2014
Friday, 14 March 2014
Calligraphy-14.03.2014
आज १४ मार्च … ज्येष्ठ कवी सुरेश भट ह्यांचा स्मृतिदिन …. रंग माझा वेगळा ही कविता … संपूर्ण कविता अशी
रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतापारी
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन कुठे आयुष्य नेले कापुनी माझा गळा?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा;
"चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा!"
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी;
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
A calligraphic tribute to Poet Suresh Bhat
Saturday, 8 March 2014
Calligraphy-08.03.2014
आज ८ मार्च …. ज्येष्ठ कवी आरती प्रभु ह्यांचा जन्मदिन …. त्या निमित्त त्यांच्या " दिवेलागण " ह्या काव्यसंग्रहातील कविता … ' ये रे घना ….
आरती प्रभुना सुरुवातीच्या ह्या पहिल्या ओळी सुचल्या त्या १९५७-५८ साली , पण ह्या शब्दाच्या पुढे संपूर्ण कविता सुचायला मात्र बरीच वर्षे गेली…
पुढे मग आरती प्रभु कोकणातलं कुडाळ गाव सोडून मुंबईला आले. मुंबई नभोवाणीवर नोकरी करू लागले . मंगेश पाडगावकर त्या वेळी कार्यक्रम अधिकारी होते. एके दिवशी आकाशवाणीवर बिस्मिल्ला खाँच्या सनईवादनाचं ध्वनिमुद्रण होतं. पाडगावकरांच्या आग्रहामुळे स्टुडिओत बसून आरती प्रभु ते वादन ऐकत होते. सनईचे सूर ऐकता ऐकता ‘ये रे घना, ये रे घना’ कविता सुचत गेली … कडवं पूर्ण झालं आणि दोन- दोन शब्दांच्या सोळा ओळींच्या कवितेची निर्मिती झाली.‘दिवेलागण’ या संग्रहातही ही कविता एवढीच होती
येरे घना
येरे घना,
न्हावूं घाल
माझ्या मना
फुले माझी
अळुमाळू
वारा बघे
चुरगळू
नको नको
म्हणताना
गंध गेला
रानावना
येरे घना
येरे घना,
न्हावूं घाल
माझ्या मना
पुढे ह्या कवितेला , श्री . हृदयनाथ मंगेशकरांनी अतिशय सुरेल चाल दिली… त्यावेळी ह्या कवितेचा परत विस्तार आरती प्रभुनी केला…
टाकुनिया घरदार
नाचणार नाचणार
नको नको म्हणताना
मनमोर भर राना
नको नको किती म्हणू
वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाटय़ाचा
वारा मला रसपाना
ज्येष्ठ कवियित्री अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या एका लेखात ह्या कवितेबद्दल लिहिताना असे लिहिले आहे की …
ये रे घना, ये रे घना, न्हावूं घाल माझ्या मना.. कोण म्हणतं आहे हे? ही कुणाची आळवणी आहे?आरती प्रभूंनी स्वत:च हे प्रश्न विचारले आहेत. ही आळवणी का सुरू आहे? कशासाठी? कुणासाठी? आणि ही आळवणी करतंय तरी कोण? खरंच, ही आळवणी त्यांची आहे? आरती प्रभू नावाच्या कवीची? की त्यांच्या कवितेचा अंत:स्वर जागा करणाऱ्या संगीतकाराची? की कवितेची स्वत:चीच?
वाटतं की, ही प्रत्येक माणसाची सदाचीच आळवणी आहे. आपली तगमग शमावी, दाह शांत व्हावा, जगण्याचा ओला गारवा आतपर्यंत झिरपत जावा, भिजावं मन यासाठी तान्हेल्या प्रत्येकाची आळवणी. तुमच्या-माझ्या मनात खोलवर सारखीच उमटत असलेली साद जणू आरती प्रभूंनी कविता होऊन प्रत्यक्ष घातली गेली आहे. आणि असं जर आहे, तर ही कविता पुरी झालेली नाहीच. प्रत्यक्षात ती जशी सुरुवातीला प्रसिद्ध झाली तेव्हा थोडी पूर्ण झाली, मग तिचं गाणं झालं तेव्हा आणखी पूर्ण झाली, मग तिचा गाण्यासाठी विस्तार झाला तेव्हा तिला अधिकच पूर्णता आली, तशी भिजण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येकाच्या मनात ती सारखी नव्यानं पूर्ण होत राहणार आहे.. आणि तोवर ती अपूर्णच राहणार आहे. एखादी कविता अपूर्णतेचं असंही वरदान घेऊन येते! ते तिचं भाग्य असतं, कवीचं भाग्य असतं आणि रसिकांचंही.
Subscribe to:
Posts (Atom)