| सही धरम |
आज २४ डिसेंबर … मराठी लेखक आणि स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी ह्यांची जयंती … … मराठी संस्कृत , तत्वज्ञान ह्या विषयातील उच्च पदवी प्राप्त केल्यावर साने गुरुजींनी शिक्षकी पेशा स्वीकारला … त्यांच्या अनेक सुंदर रचना शाळेत असताना शिकलेल्या
त्यातलीच एक रचना ,खूप वर्षांनी अगदी परवा ,एका ' दुसऱ्या गुरुजीनी' ऐकवली …… ही शाळा आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड ह्या गावी … महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील होतकरू विद्यार्थ्यासाठीची निवासी शाळा …शाळेतले विद्यार्थी लमाण, पोतराज , घिसाडी , कैकाडी , वडार , मसनजोगी , वासुदेव,धनगर , वंजारी अशा अनेक जाती जमातीतील … ह्या विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांच्यावर संस्कार करण्याचा ध्यास घेतलेले शिक्षक … श्री शिवाजीराव आंबुलगेकर … स्वतः कवी असलेल्या ह्या शिक्षकांनी मराठी माणसाला अभिमान वाटेल अनेक सुंदर सुंदर उपक्रम ह्या शाळेत राबवले आहेत … त्यातलाच गेले १० वर्ष सुरु असलेला उपक्रम म्हणजे ' अनुवादाची आनंद शाळा '
मराठीतील पाठ्य पुस्तकातील कविता वर्गात ह्या मुलांना शिकताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी खरे तर सुरु झालेला हा उपक्रम … वर्गात शिकत असलेली मराठी कविता आपल्याच बोली भाषेत अनुवाद करण्याचा हा छंद अन बघता बघता ह्या छंदातून ,बोलींचे शब्दकोष तयार होऊ लागले … मुलांना मराठी कविता तर कळू लागली पण होऊअसे लागले की त्या 'कवितेची भाषा ' आपल्या बोलीभाषेत करू शकू हा आत्मविश्वास प्राप्त झाला अन मराठीतील नामवंत कवींच्या कविता ह्या शाळेत गोरमाटी , वंजारी , दखनी मुसलमानी , पारधी सारख्या अनेक बोलीभाषेत अनुवाद होत आहेत
मागच्या आठवड्यात ,शेजारच्या देशात , एका शाळेत क्रौर्याची परिसीमा गाठली गेली …. आणि महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील 'दखनी मुसलमानी 'जमातीतील मुबारक दस्तगीर भांडे ह्या मुलाने साने गुरुजींच्या 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' ह्या रचनेचा आपल्या बोलीभाषेत अनुवाद केला … सही धरम
'इस्लामी संस्कृती 'वर सुंदर पुस्तक लिहिणाऱ्या साने गुरुजीना ,आजचा अक्षर सलाम ' सही धरम 'मधल्या काही ओळीतून

















































