Showing posts with label ग्रेस. Show all posts
Showing posts with label ग्रेस. Show all posts

Saturday, 20 September 2014

Calligraphy-19.9.2014




कवी ग्रेस ह्यांची 'दुःख' ही कविता
विकायला आज 
निघालो मी व्यथा 
जुनी माझी कथा 

कोण घेई ?
तुझ्या बाजाराचे 
वेगळेच भाव 
कसें माझे घांव 
खपतील?
हाडांच्या रे भिंती 
मातीच्या या घरा 
दुःखाचा हा भारा 
कोण घेई ?
कोण घेई माझ्या
ओसाडाचा भोग 
त्याच्या घरा आग 
लागायची !
म्हणूनच माझी
दुःखावर माया 
वेगळीच काया 
हवी मला !

A calligraphic tribute to Poet Grace

Wednesday, 2 October 2013

Calligraphy-02.10.2013




कवी ग्रेस ह्यांच्या " संध्याकाळच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील पाऊस ह्या कवितेतील काही निवडक ओळी . 
संपूर्ण कविता ही अशी 
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

A calligraphic tribute to Poet Grace.

Saturday, 22 June 2013

Calligraphy-22.06.2013


कवी ग्रेस ह्यांची ‘निळाई’ ही कविता. आणि श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा  
“असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले
"असे रंग आणि ढगांच्या किनारी “

निळे सूर आणि निळी गीतशाळा 
निळाईत आली सखीची सखी 
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची 
भिजेना परी ही निळी पालखी … 
किती खोल आणि किती ओल वक्षी 
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे 
प्राणातले ऊन प्राणात गेले 
तुझ्या सागराची निळी तोरणे 
ग्रेस यांना निळाईचे फार आकर्षण होते..त्यांनी आपल्या बर्‍याच कवितात निळे, निळी निळाई या शब्दांचा प्रयोग केला आहे परंतु या सर्व निळाईत उदासीनता आणि दु:खाची छाया नेहमीच पसरलेली दिसेल.ग्रेस साठी 'निळे' हे दु:ख आणि उदासीनतेचे प्रतीक आहे.. . 'असे रंग आणि ढगांच्या किनारी' या कवितेत निळ्या आकाशात प्रतिक्षण बदलणार्‍या ढगांच्या रंगांचे आणि चित्रविचित्र आकृतींचे अद्भुत वर्णन केले आहे.त्या आकृती कधी घाटमाथे, कधी राउळ ,कधी पाउलवाटा, कधी पाखरे या रुपात दिसतात पण त्याच्यातही उदासीनतेची छाया आहे.त्यांनी अस्तकालीन सूर्यनारायणास दुक्ख दूर करण्याची ही प्रार्थना केली आहे.
निळ्या आकाशातील प्रत्येक क्षणी बदलणार्‍या ढगात आणि विविध रंगात मला दुःखाच्या उन्हाचाच भास होत आहे.पहाडी घाटांवर वस्ती करणार्‍या लोकांचे जीवन बघून माझ्या डोळ्यांत पाणीच येते.त्यांच्या येण्याजाण्याच्या पाऊलवाटा मंदार वृक्षांच्या काट्यांप्रमाणे भरलेल्या आहेत.सर्वत्र पसरलेल्या धुक्याने त्यांचा संपर्क जगाशी तुटलाच आहे. हे अस्तकालीन सूर्यनारायणा !, तू अंधार दूर करून त्यांचे दुःख दूर कर अशी किती प्रार्थना करू ? संध्याकाळ झाली आणि नदी तलावाकडून थंड वारे येऊ लागले.चंद्र उदय होणार म्हणून संध्या डोलू लागली आहे संध्याकाळ झाल्यामुळे पक्ष्यांचे थवे थकून आपल्या घरट्यांकडे परतत आहेत.त्यांची आजची भूक भागली पण त्यांना उद्याच्या दुःखाची चिंता लागलेलीच आहे.

Tuesday, 11 June 2013

Calligraphy-11.06.2013

कवी ग्रेस ह्यांची "पाऊस " ही कविता 
पाऊस 
देवळाजवळचा ;
पाराजवळचा 
पाऊस. 
देवळापलीकडचा 
परापलीकडचा 
पाऊस 
 सर्व 

पाऊस 
रस्तोरस्ती 
रस्त्याच्या पलीकडचा 
पाऊस 
रस्त्यात 
सर्व  काळोखात 
वस्त्यात 

आयुष्यात 
गल्लीबोळात 
जुनेरात 
आठवणींच्या 
पातळात 
समईत 


पाऊस 
डोळ्यांत 
सर्व. 

Wednesday, 23 January 2013

Calligraphy-23.01.2013

कवी ग्रेस ह्यांच्या " ओळख " ह्या कवितेतील हे शेवटचे कडवे.. पूर्ण कविता आणि त्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ह्याप्रमाणे ...

ओळख :ग्रेसने या कवितेत वर्तमान आणि भूतकाळाला जोडणाऱ्या आठवणी किती मार्मिक असतात हे दाखविले आहे. त्यांना उन्हाळ्यातील एका सरत्या रात्रीत एका वृद्ध बाईच्या ओवीची आठवण आली आहे.'ओठांची मिथिला ल्याया' या ओळींची पृष्ठभूमी महाभारतातल्या एका कथेत आहे. सीतेचे वडील जनक हे प्राचीन मिथिला नगरीचे राजे होते. मिथिला नगरीत एकदा भयंकर आग लागून ती नष्ट झाली होती. ग्रेसने या अग्निदाहाचा संदर्भ अतोनात उष्म्यासाठी दिला आहे. 

मालविल्या सांज-दिव्यांची
तम मार्गावरती खंत
वृद्धेच्या ओवी मधला
उरी दाटून ये भगवंत
पानाच्या जाळीमधले
वाऱ्याचे कुंडल डुलते
ओठांची मिथिला ल्याया
पदरातून नभ व्याकुळते
तुटलेली ओळख विणता
प्राणांची फुटते वाणी
पायातून माझ्या फिरतो
अवकाश निळा अनवाणी

मी बघत आहे की आकाशातील तारे अस्त होऊन अंधार झाला आहे आहेत आणि मला कधीतरी रात्रीच्या अंतिम प्रहरात जात्यावर बसून देवाच्या प्रेमाने दाटून आलेल्या वृद्ध स्त्रीचे ओवी गाणे आठवत आहे. या वेळी वृक्षावरून खाली गळलेली जाळीदार सुकलेली पाने वार्‍यामुळे कुंडलासारखी निरंतर इकडून तिकडे होत आहेत. अत्यधिक उष्म्यामुळे ओठ शुष्क झाले आहेत पण ती ओवी गाणारी वृद्ध बाई जणू आपला पदर हलवून मला शांती देण्याचा प्रयत्न करत आहे .जुन्या आठवणीना उजाळा मिळाल्यावर माणूस किती हळवा होऊन जातो. अशा आठवणी आल्यावर तो स्वतःचे दुक्ख त्यांच्यात विसरून भूतकालात फिरतच राहतो

Thursday, 11 October 2012

Calligraphy-11.10.2012





कवी ग्रेस ह्यांची ही कविता... ह्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा.. 

जे सोसत नाही असले – 
 जे सोसत नाही असले
तू दुक्ख मला का द्यावे
परदेशी अपुल्या घरचे
माणुस जसे भेटावे
 मिटल्यावर  डोळे मजला
स्मरतात निरंतर नाद
हाताने मागावे का
त्यांचे  नवे पडसात
 अंधारच असतो मागे
अन पुढे सरकतो पारा
सूर्याच्या सक्तीनेही
कधी नष्ट न झाल्या तारा
 हातात तुझ्या जे आले
ते मेघ न फूल न गाणे
स्वप्नातही स्पष्ट समजते
हे असे अवेळी फुलणे

ग्रेस देवाला विचारतात की मला सहन होणार नाही असे दुक्ख मला तू का दिले आहेस? मी कुठेही गेलो तरी ते माझ्या मागेच असते. काही वेळा वातावरणात बदल व्हावा म्हणून माणूस परदेशी जातो परंतु तेथेही पूर्वीचे वातावरणात काहीच बदल होत नाही.झोपेतही मला निरंतर जुन्या अप्रिय आठवणी येतात आणि माझ्या हातानी ज्या नवीन कविता लिहिल्या जातात त्यातही त्याच आठवणी काहीश्या नवीन रूपात प्रकट होतात.माझ्यामागे सतत अंधकार पाठलाग करत असतो.रात्र संपून सूर्याचा प्रकाश झाला तरी तो अंधार आणि तार्यांचे अस्तित्व नष्ट करू शकत नाही.तसेच माझ्या जीवनातला अंधकार राहणारच. तुझ्या हातात माझ्या ज्या कविता येतात त्यात फुलांचा सुगंध किवा संगीताचे स्वर नाहीत  नाही परंतु मेघाचे अश्रू आहेत. माझ्या कवितांचा बहर अवेळी का येतो हे स्वप्नातही कळू शकेल कारण त्या नेहमीच दुक्खाने परिपूर्ण असतात.


Sunday, 26 August 2012

Calligraphy-26.08.2012


कवी ग्रेस ह्यांची " संध्याकाळच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता... ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ही सोबत देत आहे.

ग्रेस - विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा- 
दुःख घराला आले -श्रीनिवास हवालदार
दुःख घराला आले: पृष्ठभूमी- अमावस्येचा दिवस म्हणजे "ग्रेस' साठी कवी नव्हेतर  व्यक्ती म्हणून जीवनातला सर्वात काळा दिवस हे त्यांच्या एका अन्य कवितेवरूनही दिसून येईल आई’च्या खालील देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या "ग्रेस'च्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली,.
‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
उपरोक्त कवितेचे सखोल विश्लेषण करणे मला आवश्यक वाटत नाही '.दुःख घराला आले' या खालील कवितेत उपरोक्त घटनेचे प्रतिसाद दिसून येतात.
अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले
दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे
या अमावास्येच्या दिवशी घनघोर अंधकार पसरलेला आहे. रात्री प्रकाश देणाऱ्या चंद्राचे अस्तित्व अमावास्येच्या चंद्रातच लुप्त झाले आहे..आईच्या अत्यंत सुखद आठवणी कृष्णपक्षातील चंद्राच्या कलांनप्रमाणे हळूहळू संपत गेल्या आणि दुक्खाने पूर्ण घरास व्यापून टाकले.मी घराच्या दारावर बसून अचानक आलेल्या दुक्खास सामोरे जात होतो..अफाट क्षितिज आणि पृथ्वी यांच्या अस्तित्वाची सीमारेषा फार बारीक असते. पृथ्वीचे अस्तित्व असते पण क्षितिजात ते कोठे विलीन होते हे समजत नाही.तसेच माझे अस्तित्वही दुक्खात विलीन झाले होते. या अपरंपार दुक्खाच्या सागरात पार लागून विश्वास करण्यायोग्य किनारे कुठे आढळतात ? माझ्या हृदयात वृक्षांची शुष्क पाने गळत आहेत असा भास मला होत होता. या जगात असे कोणीच नाहीत जे आपले प्राण जात असतानाही आपली मदत करतील किवा अत्यंत दुक्खाच्या वेळी धीर देतीलस ह्यांची " संध्याकाळच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता... ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ही सोबत देत आहे.

ग्रेस - विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा- 
दुःख घराला आले -श्रीनिवास हवालदार
दुःख घराला आले: पृष्ठभूमी- अमावस्येचा दिवस म्हणजे "ग्रेस' साठी कवी नव्हेतर  व्यक्ती म्हणून जीवनातला सर्वात काळा दिवस हे त्यांच्या एका अन्य कवितेवरूनही दिसून येईल आई’च्या खालील देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या "ग्रेस'च्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली,.
‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
उपरोक्त कवितेचे सखोल विश्लेषण करणे मला आवश्यक वाटत नाही '.दुःख घराला आले' या खालील कवितेत उपरोक्त घटनेचे प्रतिसाद दिसून येतात.
अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले
दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे
या अमावास्येच्या दिवशी घनघोर अंधकार पसरलेला आहे. रात्री प्रकाश देणाऱ्या चंद्राचे अस्तित्व अमावास्येच्या चंद्रातच लुप्त झाले आहे..आईच्या अत्यंत सुखद आठवणी कृष्णपक्षातील चंद्राच्या कलांनप्रमाणे हळूहळू संपत गेल्या आणि दुक्खाने पूर्ण घरास व्यापून टाकले.मी घराच्या दारावर बसून अचानक आलेल्या दुक्खास सामोरे जात होतो..अफाट क्षितिज आणि पृथ्वी यांच्या अस्तित्वाची सीमारेषा फार बारीक असते. पृथ्वीचे अस्तित्व असते पण क्षितिजात ते कोठे विलीन होते हे समजत नाही.तसेच माझे अस्तित्वही दुक्खात विलीन झाले होते. या अपरंपार दुक्खाच्या सागरात पार लागून विश्वास करण्यायोग्य किनारे कुठे आढळतात ? माझ्या हृदयात वृक्षांची शुष्क पाने गळत आहेत असा भास मला होत होता. या जगात असे कोणीच नाहीत जे आपले प्राण जात असतानाही आपली मदत करतील किवा अत्यंत दुक्खाच्या वेळी धीर देतील

Monday, 13 August 2012

Calligraphy-13.08.2012


 कवी ग्रेस ह्यांची " संध्याकाळच्या कविता" मधील " श्रावण " ही kavita
Today's calligraphic tribute to Poet Grace's Shravan poem 

Monday, 6 August 2012

Calligraphy-06.08.2012


कवी ग्रेस  ह्यांची असे रंग आणि ढगांच्या किनारी ही कविता.. ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी केलेली समीक्षा ....

असे रंग आणि ढगांच्या किनारी:
ग्रेस यांना निळाईचे फार आकर्षण होते .त्यांनी आपल्या बऱ्याच कवितात निळे, निळी निळाई या 
शब्दांचा प्रयोग केला आहे परंतु अ
शी कोणतीही कविता घ्या या सर्व निळाईत उदासीनता आणि दु:खाची छाया नेहमीच पसरलेली दिसेल. ग्रेस साठी 'निळे' हे दु:ख आणि उदासीनतेचे प्रतीक आहे.. . 'असे रंग आणि ढगांच्या किनारी' या कवितेत निळ्या आकाशात प्रतिक्षण बदलणाऱ्या ढगांच्या रंगांचे आणि चित्र विचित्र आकृतींचे अद्भुत वर्णन केले आहे.त्या आकृती कधी घाटमाथे, कधी राउळ,कधी पाउलवाटा, कधी पाखरे या रुपात दिसतात पण त्याच्यातही उदासीनतेची छाया आहे.. .

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

निळ्या आकाशातील प्रत्येक क्षणी बदलणाऱ्या ढगात आणि विविध रंगात मला दुःखाच्या उन्हाचाच भास होत आहे.पहाडी घाटांवर वस्ती करणाऱ्या लोकांचे जीवन बघून माझ्या डोळ्यात पाणीच येते.त्यांच्या येण्याजाण्याच्या पाऊलवाटा मंदार वृक्षांच्या काट्यानप्रमाणे भरलेल्या आहेत.सर्वत्र पसरलेल्या धुक्याने त्यांचा संपर्क जगाशी तुटलाच आहे. हे अस्तकालीन सूर्यनारायणा! तू अंधार दूर करून त्यांचे दुःख दूर कर अशी किती प्रार्थना करू ? संध्याकाळ झाली आणि नदी तलावाकडून थंड वारे येऊ लागले.चंद्र उदय होणार म्हणून संध्या डोलू लागली आहे.पक्ष्यांचे थवे थकून संध्याकाळ झाल्यामुळे आपल्या घरट्यांकडे परतत आहेत .त्यांची आजची भूक भागली पण त्यांना उद्याच्या दुःखाची चिंता आहेच!

Today's calligraphic tribute to Poet Grace.

Saturday, 28 July 2012

Calligraphy-28.07.2012



जेष्ठ कवी ग्रेस ह्यांची ही रचना.
संगीतकार यशवंत देव ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Poet Grace .
This poem has been composed by Yashwant Dev and sung by Padmaja Phenany Joglekar