Wednesday 27 February 2013

Calligraphy-27.2.2013


कणा : एक अनोखा अक्षर अनुभव




आज २७ फेब्रुवारी.. कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. मराठी भाषादिन ...
कुसुमाग्रजांची अतिशय प्रसिद्ध कविता कणा .. ह्या कवितेने केवळ मराठी रसिकानांच भुरळ घातली असे नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि कवी गुलजार ह्यांनी ह्या कवितेचा सुरेख अनुवाद केला.. अन शीर्षक दिले
." रीढ "  ..

खरतर " रीढ" कविता अक्षरबद्ध केली पण " रीढ" चे उर्दू सुलेखन जमेना. तेव्हा प्रसिद्ध सुलेखनकार प्रकाश पठारे ह्यांच्याशी संवाद साधला  , आणि त्यांनी रीढ हा  मांडताना " कणा " स्वरुपात उर्दू सुलेखनातून एक अनोखा अक्षर अनु भव  करून दिला .

आजच्या जागतिक मराठी भाषादिनाचे औचित्य साधताना " माझा मराठीचा बोलू कौतुके "  सांगण्यासाठी निवडलेला  हा वेगळा अक्षर अनुभव....

A calligraphic tribute to Poet Kusumagraj's famous poem " Kana" which is translated by Poet Gulzar ( beautiful Urdu Calligraphy of Reedh by- Prakash Pathre) Pl visit to www.calligraphicexpressions.blogspot.com to see previous poems

Monday 25 February 2013

Calligraphy-25.02.2013



आजची कविता आणि त्याबद्दलचा एक योगायोग 

परवा शुक्रवारी २२ फेब्रुवारीच्या तरुण  भारत मधील माधवी भट ह्यांचा ' अट्टाहास : एक कोलाज' हा ललित लेख वाचता वाचता एका कवितेची ओळ वाचनात आली आणि का कुणास ठाऊक ती ओळ त्या क्षणी चटकन आवडून गेली आणि पुढचे २४ तास ही कविता शोधण्यात गेलेकवी  खलील मोमीन ह्यांची जे उरात उरते ही कविता .. केवळ कविताच मिळाली असे झाले नाही.. इंटरनेटवर एके  ठिकाणी त्यांचा मोबाइल नंबरही मिळाला . मनात कुठे तरी वाटून गेले.. ही कविता Calligraphy  केली तर त्यांना आवडेल का ह्या विचाराने SMS केला खरा आणि आश्चर्य असे की पुढच्या  मिनिटात कवी खलील मोमीन ह्यांनी स्वतःच फोन केला आणि मी करत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली आणि  दुसऱ्याच मिनिटात ते म्हणाले उद्या रविवारी सकाळी भेटू शकाल का .सकाळी १० वाजता शनिवारवाड्याजवळ मी वाट पाहतो.
आणि काल सकाळी बरोबर १० वाजता खूप लांबचा प्रवास करत आलेले कवी खलील मोमीन प्रत्यक्ष भेटले .गेल्या ३६५ दिवसात निवडलेल्या कविता बघता त्या सर्व कवी बरोबर आलेले अनुभव त्यांच्याकडून कळाले . एवढ्याचवर ते थाबले नाहीत तर पुढचे दोन  तास  "कविता ही  प्रतिमेची भाषा असते " कशी  हे सांगता सांगता  कुसुमाग्रज , बोरकर ,  भा धामणस्कर ,वा रा कांत , शंकर वैद्य , यशवंत मनोहर , कविता महाजन ह्या दिग्गज कवींच्या कवितेमध्ये ह्या प्रतिमा कशा साकारल्या गेल्या आहेत त्याची उदाहरणे देत गेले . सर्व कविता मुखोद्गत . वयाच्या ६८ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवील असा काहीसा उत्साह .. सगळ्यात आश्चर्याचा धक्का बसला ते त्यानी भेट दिलेले  त्यांचे हस्ताक्षर पाहून .. अतिशय ,बारीक,कोरीव आणि सुबक अक्षर , 
वृत्तपत्र वाचता वाचता, कवितेची कधीही न वाचलेली एक ओळ सापडते काय आणि पुढच्या ४८ तासात तीच   कविता लिहिणाऱ्या   कवीसोबत दोन तासाची  अविस्मरणीय भेट होते काय... योगायोग  तो असा 
 मनमाडचे ज्येष्ठ गझलकार आणि कवी खलील मोमीन ह्यांना आजचा अक्षर सलाम ( सोबत  मोमीन ह्यांच्या स्वतःच्या अक्षरातील वावटळ ही कविता )
A calligraphic tribute to Poet Khalil Momin

Friday 22 February 2013

Calligraphy-22.03.2013


ज्येष्ठ कवी कै . रा.काळेले ( रामचंद्र अनंत काळेलेह्यांचा आज जन्मदिवस .२२ फेब्रु१९०७ रोजी जन्मलेल्या   रा.काळेले  ह्यांचे  सारे आयुष्य मध्यप्रदेशातील इंदूर येथे  गेलेमहाराष्ट्राच्या बाहेर राहून, मराठीतील त्यांचे उत्तमोत्तम  असे  कवितासंग्रह तसेच  भा रा तांबे : एक अध्ययन आणि नवकवितेचे एक तप -१९४५ ते ५७ हे समीक्षा ग्रंथही  प्रसिद्ध आहेत . इंदूरच्या होळकरांनी त्यांना " राजकवी " ह्या सन्मानाने गौरविले होते. पण  दुर्दैवाने इतक्या सुंदर कविता  मराठी साहित्यात लिहिणारे कै काळेलेफारसे  परिचित कवी म्हणून ओळखले गेले नाहीत
सांग ना ताई ही त्यांनी लिहीलेली १९३४ सालची अतिशय ह्रदयद्रावक कविता . मृत्यु म्हणजे काय हीच कल्पना नसलेल्या दोन छोट्या बहिणीच्यावर आईचा वियोग सहन करण्याची जेव्हा वेळ येते  त्यावेळी  छोट्या मुलीच्या मनातले प्रश्न ह्या विषयावरील ही कविता 
A Calligraphic tribute to Poet  Late Ra A Kalele.

Monday 18 February 2013

Calligraphy-18.02.2013


जेष्ठ कवी रॉय किणीकर अर्थात रघुनाथ रामचंद्र किणीकर ह्यांची ही रचना . किणीकर ह्यांनी आंधळे रंग पांढऱ्या रेषा हा कथासंग्रह , कोणार्क ही कादंबरी , ये ग ये ग विठाबाई , खजिन्याची विहिर सारखी नाटके, एकांकीका , अनुवाद ,आणि बालसाहित्य अशा साहित्या तील सर्व प्रांतात अतिशय सुंदर लेखन केले . प्रामुख्याने रॉय किणीकर लक्षात राहिले ते त्यांच्या रात्र आणि उत्तर रात्र ह्या काव्य संग्रहांमुळे .त्यातील तर उत्तररात्र' या त्यांच्या अजरामर संग्रहातील छोट्या छोट्या चार ओळींच्या रचनांमधून ("रुबाया ")घातलेली मोहिनी तीन पिढ्या झाल्या तरी आजही उतरलेली नाही
A calligraphic tribute to Poet Roy Kinikar

Thursday 14 February 2013

Calligraphy-14.02.2013

आज १४ फेब्रुवारी .. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या " प्रेमयोग " ह्या कवितेतील ह्या काही निवडक ओळी .... छंदोमयी ह्या काव्यसंग्रहातील ही एक अप्रतिम कविता ..


प्रेम कुणावर करावं ?

कुणावरही करावं ..

प्रेम 
राधेच्या वत्सल स्तनांवर करावं 
कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं 
भीष्म द्रोणांच्या थकलेल्या चरणांवर करावं 
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं 
प्रेम कुणावरही करावं ..
प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं ..
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं ..
बासरीतून पाझरणाऱ्या 
सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं ..
यमुनेचा डोह जहरुन टाकणाऱ्या 
कालियाच्या फण्यावरही करावं 
प्रेम कुणावरही करावं ..

प्रेम 
रुक्मिणीच्या लालस ओठावर करावं 
वक्रतुण्डच्या हास्यास्पद पोटावर करावं 
मोराच्या पिसाऱ्यातील 
अद्भुत लावण्यावर करावं 
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं 
अन खड्गाच्या पात्यावर ही करावं 
प्रेम कुणावरही करावं ..

प्रेम 
गोपींच्या मादक लीलांवर करावं ..
पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं ..
यशोदेच्या दुधावर करावं ..
देवकीच्या आसवांवर करावं ..
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील 
नांगराच्या फाळावर करावं ..
कंसाच्या काळजातील 
द्वेषाच्या जाळावर करावं ..

प्रेम 
ज्याला तारायच 
त्याच्यावर तर करायचं 
पण ज्याला मारायचं 
त्याच्यावर ही करावं 

प्रेम योगावर करावं 
प्रेम भोगावर करावं 
आणि त्याहूनही अधिक 
त्यागावर कराव 

प्रेम 
चारी पुरुषार्थांची  झिंग देणाऱ्या 
जीवनाच्या दवावर करावं 
आणि पारध्याच्या बाणान घायाळ होऊन 
अरण्यात एकाकी पडणाऱ्या 
स्वतःच्या शवावर ही करावं 
कारण 
प्रेम आहे माणसाच्या 
संस्कृतीचा सारांश 
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष 
आणि भविष्यकालातील 
त्याच्या अभ्युदयाची आशा 
एकमेव 

Wednesday 13 February 2013

Calligraphy-13.02.2013


आज श्री गणेश जयंती. संत तुकारामांचा हा अभंग. 
( श्री गणेश शिल्प संकल्पना आणि सौजन्य - महेंद्र मोरे) .

A calligraphic tribute to Saint Tukaram's abhang on the auspicious day as Shree Ganesh Jayanti.

Monday 11 February 2013

Calligraphy-11.02.2013

ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे ह्यांच्या " यक्षरात्र " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता 
A calligraphic tribute to Poetess Aruna Dhere

Thursday 7 February 2013

Calligraphy-07.02.2013

ज्येष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांच्या " लय" ह्या  काव्यसंग्रहातील ही कविता 
A calligraphic tribute to Poet Sudheer Moghe

Monday 4 February 2013

Calligraphy-04.02.2013


मागील आठवड्यातील एक सुखद  बातमी आणि ती म्हणजे  ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर ह्यांना जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार . 

वयाच्या १४ व्या वर्षापासून गेली सात दशकं मराठी कविता आणि साहित्य समृद्ध करणाऱ्या श्री  मंगेश पाडगावकर ह्यांच्या " श्रावणात घन निळा बरसला " ह्या भावगीतातील शब्दातून अक्षर सलाम. 

A calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar