Tuesday, 24 December 2013

Calligraphy-24.12.2013


ज्येष्ठ कवी शंकर रामाणी ह्यांची गीत रचना . 

रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी
उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी

पुसणार तू कुणाला मिटलीत सर्द दारे
धारांत नाहणारी धरतीच गे ईमानी

पानातुनी मनाच्या माझेच हे शहारे
मातीत मातलेला आवेगही तुफानी

सोसून सोसवेना गात्री अलक्ष धारा
प्राशून पाप येते डोळ्यांत मूढ पाणी

प्राणांत हूड वारे हलतेच झाड आहे
त्यानीच ढाळलेली तू माळिली विराणी

A calligraphic tribute to Poet Shankar Ramani. please visit to www.calligraphicexpressions.blogspot.com to see previous poems 

Thursday, 19 December 2013

Calligraphy-19.12.2013ज्येष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांची रचना . 

ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार
नादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकार

सूर स्पर्श सूर श्रवण
स्वर गंधित आश्वासन
तिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार

सूर साध्य स्वर साधन
सूर रूप स्वर दर्पण
स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार

सप्तसूर स्वर्ग सात
स्वर सांत्वन वेदनांत
सुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार

A calligraphic tribute to Poet Sudheer Moghe

Saturday, 7 December 2013

Calligraphy-07.12.2013


ज्येष्ठ कवी प्रा. फकीरराव मुंजाजी शिंदे अर्थात फ मुं शिंदे ह्यांच्या " फकिराचे अभंग" 
ह्या काव्यसंग्रहातील ही अभंगवाणी 

मनाशीच जो जो करावा विचार 
वारावर वार  चालतात 
आपलीच इजा घ्यावी दुखवून 
जखम उतून चरताना 
आपलेच कसे काळीज दुखते 
सुगीही सुकते हंगामात 
खोल समुद्रात उंच माळावर 
जीव सुळावर चढलेला 
का ही  तडफड माझ्याच अंतरी 
दूर दिगंतरी निनादत 
घडले तसेच आताही घडते 
त्याचे का कढ ते उसळती 
कितीही वाटले कापावीच नाळ 
तेवढ्यात बाळ हुंकारते 
चाललो सोसत जन्माच्या वेदना 
काय आता कुणा निरूपावे  

Wednesday, 4 December 2013

Calligraphy-04.12.2013


कवयित्री क्रांति साडेकर ह्यांची " अलख" ही कविता . वृत्तबद्ध कवितांचा आग्रह आणि सखोल चिंतनातून कविता लिहिणाऱ्या या भाव कवयित्रीचे 'असेही तसेही ' आणि 'अग्निसखा ' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत 
अलख 

हा अलख कुणा जोग्याचा 
ही गहन कुणाची वाणी?
प्राणांच्या कंठी रुजली 
संध्यापर्वाची गाणी 

झाकोळुन नभ गंगेच्या 
पाण्यात उतरले थोडे 
क्षितिजाच्या पार निघाले 
अन् सूर्यरथाचे घोडे 

त्या मूक, उदास जलावर
धूसर वलये वाटोळी 
रेखाटत बसली कुठल्या 
कवितेच्या अनवट ओळी?

ज्या सांद्र वनातुन घुमले
अस्वस्थ क्षणांचे पावे 
ते वन सोडून निघाले 
अज्ञात दिशेला रावे 

ढळत्या सांजेच्या पदरी 
अस्फुटसा लुकलुक तारा
परतून चालला जोगी 
अन् अलख घुमवितो वारा 

क्रांति

A calligraphic tribute to Poetess Kranti Sadekar 

Tuesday, 26 November 2013

Calligraphy-26.11.2013

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची रचना . संगीतकार श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना उषा मंगेशकर ह्यांनी गायिली आहे

खिन्न या वाटा दूर पळणार्‍या
या स्मृती सार्‍या जीव छळणार्‍या

लाडक्या शपथा, लाजरी वचने
पाकळ्या त्यांच्या आज गळणार्‍या

रात वैरिण ही सात जन्मांची
आणि या उल्का तोल ढळणार्‍या

चांदण्याकाठी धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या आज जळणार्‍या

Friday, 15 November 2013

Calligraphy-15.11.2013

दिवाळीत लहान मुलांच्या हातातील फुलबाजी आणि कॅमेरा ह्यांच्या सहाय्याने केलेला " र "
Use of Fire cracker and Camera for Devnagari R

Thursday, 14 November 2013

Calligraphy-14.11.2013ज्येष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांची रचना … मन लोभले मनमोहने ..
संगीतकार राम फाटक ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायिली आहे 

मन लोभले मनमोहने
गीतांत न्हाली तुजमुळे
साधीसुधी संभाषणे

तू पाहता फुलल्या कळ्या
बागेतल्या, हृदयांतल्या
झाली निराळी स्पंदने

कळले मला दिसताच तू
माझीच तू, माझीच तू
माझे-तुझे नाते जुने

ना योजिता नजरेतुनी
मन जाय पुरते वाहुनी
आता कशाची बंधने ?
A calligraphic tribute to Poet Sudheer Moghe
Please visit to www.calligraphicexpressions.blogspot.com to see previous poems

Tuesday, 5 November 2013

Calligraphy-05.11.2013

आज ५ नोव्हेंबर..मराठी रंगभूमी दिन. कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे " सीता स्वयंवर " ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.ह्या १७० वर्षातील  सर्व ज्ञात , अज्ञात कलावंत,तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वाना आजच्या  सुलेखनाद्वारे सलाम 


कवी गुरु ठाकूरची " निम्मित्तमात्र " ही कविता  
रंगमंच त्याचा
 त्याचीच संहिता
उगा कौतुकाची 
माझी  न  पात्रता 
त्याच्या इशाऱ्याने 
नाचणारे पात्र 
मी तर केवळ 
निमित्तमात्र  

Monday, 4 November 2013

Calligraphy-04.11.2013

दीपावली शुभेच्छा 
पणतीच्या ज्योती आणि कॅमेराच्या सहाय्याने केलेली रचना 
Use of Diwali Lamps and Camera to find Calligraphic strokes..

Saturday, 2 November 2013

Calligraphy-02.11.2013


दीपावली शुभेच्छा २०१३ 

प्रसिद्ध गझलकार आणि कवी अनिल कांबळे ह्यांची कविता 

A calligraphic tribute to Poet Anil Kamble

Tuesday, 22 October 2013

Calligraphy- 22.10.2013


कवी वैभव जोशी ह्यांची " नेमस्त" ही कविता 

धरतीवर उमटत गेल्या , अलवार उन्हांच्या ओळी 
तो शहारला नेमाने,ही कविता सुचतेवेळी 
नित्यागत उमलत गेली ,हळुवार कल्पना त्याची 
सवयीचा सुगंध आला, होताच फुले शब्दांची 

नेमस्त हरखला तो ही , द्याया ना उरले काही 
नेमस्त चरकला फिरुनी .. . ही शेवटची  तर नाही??
रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते 
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते !!

A calligraphic tribute to Poet Vaibhav Joshi' poem Nemast.

Friday, 18 October 2013

Calligraphy-18.10.2013


Use of SLR Camera as a tool for calligraphic strokes while watching the musical fountain.. The color image is transferred to black and white later on...

Sunday, 13 October 2013

Calligraphy-13.10.2013


आज विजयादशमीनिमित्त  सुलेखनासाठी निवडलेली  कवी किशोर पाठक ह्यांची ही रचना 
A calligraphic tribute to Poet Kishor Pathak

Wednesday, 2 October 2013

Calligraphy-02.10.2013
कवी ग्रेस ह्यांच्या " संध्याकाळच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील पाऊस ह्या कवितेतील काही निवडक ओळी . 
संपूर्ण कविता ही अशी 
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

A calligraphic tribute to Poet Grace.

Tuesday, 24 September 2013

Calligraphy-24.09.2013ज्येष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांच्या " लय" ह्या काव्यसंग्रहातील ही कविता 
A calligraphic tribute to Poet Sudheer Moghe

Monday, 9 September 2013

Calligraphy-09.09.2013


संत ज्ञानेश्वर माउलीनी ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायात, विश्वस्वरूप निर्गुण श्री गणेशाचे वर्णन करताना रचलेल्या ह्या काही निवडक ओव्या.. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना . आपल्या गान प्रतिभेने अवघ्या विश्वाला भुरळ पाडणाऱ्या लता मंगेशकर ह्यांनी ही रचना गायिली आहे.
( श्री गणेश शिल्प- महेंद्र मोरे पुणे)

A calligraphic tribute to Saint Dnyaneshwar.

Tuesday, 3 September 2013

Calligraphy-03.09.2013


वयाच्या १४ व्या वर्षापासून गेली सात दशकं मराठी कविता आणि साहित्य समृद्ध करणाऱ्या श्री  मंगेश पाडगावकर ह्यांच्या " श्रावणात घन निळा बरसला " ह्या प्रसिद्ध भावगीतातील हे  शब्द …
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
 संपूर्ण गीत असे… 

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्‍नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा


A calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar

revious p

Wednesday, 28 August 2013

Calligraphy-28.8.2013


सुलेखनातून ह्या वर्षीचा अक्षर श्रावण सजवताना प्रसिद्ध गीतकार आणि कवी गुरु ठाकूर
 ह्यांच्याकडून मिळालेली " नक्की श्रावण" ही कविता 
कधी सरींची सोनपेरणी 

कधी उन्हाचा उनाड चाळा 
नक्की श्रावण 

आणि धरेचा पदर पोपटी 
क्षणाक्षणाला दिसे निराळा 
नक्की श्रावण 

रानपाखरे बोलू लागली 
वसुंधरेची हिरवी बोली 
नक्की श्रावण
A calligraphic tribute to Poet  Guru Thaakur

Wednesday, 21 August 2013

Calligraphy-22.08.2013ज्येष्ठ कवयित्री शान्ता शेळके ह्यांची प्रसिद्ध रचना

   ऋतु हिरवा ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा

भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा

A calligraphic tribute to Poetess Shanta Shelke

Thursday, 15 August 2013

Calligraphy-15.08.2013स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा ....

मराठी लेखक आणि स्वातंत्रसेनानी साने गुरुजी ( पांडुरंग सदाशिव साने ) ह्यांची ही प्रसिद्ध रचना. 

Today's calligraphic tribute to Sane Guruji's ( Pandurang Sadashiv Sane) famous poem Balsagar Bharat Hovo" 

Wednesday, 14 August 2013

Calligraphy-14.08.2013बालकवी ( त्र्यंबक बापुजी ठोंबरे ) ह्यांची ही प्रसिद्ध कविता

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे 
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे 
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
पूर्ण नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते 
उतरुनी येती अवनीवरती ग्रहगोलाची की एकमते 
फडफड करून भिजले अपुले पंख पाखरे सावरती 
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला 
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला 
सुंदर परडी घेउनी हाती पुरोपकंठी शुद्धमती 
सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती 
देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात 
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत 
Today's calligraphic tribute to Poet Balkavi ( Trymbak Bapuji Thombare)

Wednesday, 7 August 2013

Calligraphy-07.08.2013
सृष्टीला सौंदर्याचं देणं देणारा, निसर्गामध्ये नवचैतन्य आणणारा  श्रावण महिना  आजपासून सुरु होतोय… 
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ह्यांनी लिहिलेली श्रावणाच्या आगमनाची ही कविता . पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी गायिलेल्या ह्या कवितेला गिरीश जोशी ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. 

हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला...


तांबुस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत, श्रावण आला...
मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाशवाटेने श्रावण आला...लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत, श्रावण आला...

इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी, संध्येच्या गगनी, श्रावण आला...


लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला...
सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला...

Sunday, 4 August 2013

Calligraphy-04.08.2013


कवी जयंत शिरडकर ह्यांच्या " स्वतःशीच" ह्या काव्यसंग्रहातील कविता ..

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा.........................!
A calligraphic tribute to Poet Jayant Shirdkar. 

Monday, 29 July 2013

Calligraphy-29.7.2013ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे ह्यांची " पागोळीसारखी " ही कविता . ह्या कवितेच्या आशयासंदर्भातील प्रा माधवी भट ह्यांचा लेख. 
करुणाष्टक मला कायम आवडत आलेय.त्यातल्या सर्वच भावांसकट .एकतर त्या अष्टकाला नैसर्गिक कातरपणाची आगळीच पार्श्वभूमी लाभते.त्यातून ते म्हणताना त्यातले धीर गंभीर भाव...भरूनच येतं मला...बाहेर पाऊस पडत असावा मुसळ्धार ...त्या पावसात आपलं कोणी नाहिये ना सापडलेलं याची खात्री करूनही होत नसावी...अंधारून यावे..संध्याकाळीच गडद रात्रीचे भास ..रात किड्यांची कीरकीर,आणि अश्यावेळी अगदीच काय काय आठवून मन भरून यावं.आप्तांचा वियोग.अवेळीचे मृत्यू..अपेक्षाभंग..साध्या बारक्या इच्छांवर पडलेले आपल्याच माणासांचे निर्दयी पाय आणि त्या इच्छांचे गेलेले प्राण...सर्वच! अस्फ़ुट हुंदका घशात दाटतो..डोळ्यांपुढचं सारं धूसर होतं..पोरकेपणाने खिडकीशी उभे राहतो आपण..बोच-या गारव्यात मायेने जवळ घ्यायला आजीची उबदार कुशी नसते की गरम वाफ़ेभरला भात खाऊ घालणारी जिवाभावाची सखी नसते..अशा घाबरून गेलेल्या वातावरणात शांतपणे सात्विक चेह-याने नंदादीप उजळणारी आणि विझू पाहणारी वात हलकेच वर सारून आशा तेवत ठेवणारी आईपण नसते..दिवा लावल्यावर त्या ज्योतीचा उजेड आधी आएच्या दोन्ही डोळ्यात प्रकाशतो तेव्हा आई जास्तच आश्वासक वाटते ,तिचा चेहरा वारंवार डोळ्यापुढे येतो आणि कानात करुणाष्ट्क घुमू लागते- अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दीनदयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता खिडकिच्या बंद काचेवर बाहेरून अविरत कोसळणारा पाऊस दिसत रहावा तसाच मनावर करुणाष्टकाचा पाऊस झरतो आणि जोडीला डोळे झरत जातात...! करुणाष्टक अधिक आर्त करीत जाते वातावरण..तश्याच काही कविताही असतातच...! ग्रेसच्या संध्याकाळच्या कविता वाचून तर कित्त्येकदा ती हुरहुर रात्रभरही पुरत जाते...व्यापून उरते....! पण या कासावीस होण्याची खरी सुरुवात होते ती या करुणाष्टकानेच....! परवा अरुणा ढेरेंची "पागोळीसारखी " ही कविता वाचनात आली...कविता वाचून अस्वस्थता वाटायची ती वाटलीच....!मनस्वी मनाच्या माथ्यावर सटवाईने एकाकीपणाचा लेख अधिक गडद अक्षरात लिहिलेला असतो बहुदा.....कारण अनेक लोकातही ती एकटी मने स्पष्ट दिसतात ,....जाणवतात...! उदासीनता घेरून घेते...आणि मग आपलं कुणीच नाही ही जाणिव गहीरी होत जाणे....हे अपरिहार्यच...! मनाच्या गूढ काळ्या डोहात अधिकाधिक डूंबत जायचे...याला पर्याय नाही..! बालकवींच्या निसर्गकवितेचा विचार केला तरी लक्षात येइल की त्यांनी पारवा..घुमट या कविता मनाच्या ज्या अवस्थेत लिहिल्या ती अवस्था फ़ार एकलेपणाचीच होती...! आपल्या उदासीनता नावाच्या कवितेत बालकवी लिहितात ते मोठे मार्मिक आहे....ते म्हणतात ही उदासीनता नक्की कुठून कशी येते? मनाला नक्की काय बोचतं?ते सुद्धा कळत नाही..मग अश्यावेळी मनावर इलाज तरी कोणता करावा? कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळवायाला ? कुणीकडे हा झुकतो वारा हाका मारी जीव कुणाला? मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती,परि ती दिव्य औषधी कसली त्याला? ही अवस्था अनेकांची अनेकदा होते..! काय झालंय असे कोणी विचारले तरी त्यावर उत्तर देता येऊ नये...हे मोठे वाईट असते....! विशेषत: तेव्हा जेव्हा सर्वच बोलून दाखवायचा काळ असतो... त्यावेळी आपल्या मनातली वादळे न सांगता कुणाला कळतील ही अपेक्षा करणेही चुकीचेच आहे ना? खूप मळभ दाटून यावे मनात.....घडल्या न घडल्या घटनांचे कढ ....आणि खिन्न होत जावे.....मनातल्या मनात खूप झरावेत अषाढ मेघ..आणि त्या अश्रुतून ..तुडूंब कातर उदासी मात्र पागोळीसारखी झरत रहावी...! नेमकी ही संध्याकाळची कातरवेळा असावी..आणि आधिच्याच गडद वातावरणात काळवंडून जावे मन...! चारी बाजुंनी प्रतिकुलता वेढू लागली की त्यात हरवत जाते सारेच...! आपले प्रेयस श्रेयस सर्वच...! अरुणा ढेरेंच्या करुणाष्तकातही ही खंत भरून आहे ...त्या एका कडव्यात लिहितात... गडद गडद झाले सावळे मेघ काळे लूकलूक हृदयाची चांदणी त्यात हाले सगूण म्हणून घ्यावे शब्द तेही रिकामे अवघड मन त्याचे दु:ख कोणास ठावे? अश्यावेळी कुणीच नसतं आपलं .....शिवाय असे दुर्मुखलेले चेहरे कुणालाही नको वाटतात...आपलं मन आपल्यालाच सांभाळावं लागतं...! काळाने क्रूरपणे हिरावून घेतलेले आपले जीवलग आपल्याला स्मरतात....! ते कधीही परतणारे नसतातच...! भिजता पापणी पूस म्हणणारे जवळ आपुले कोणी नाही.......! मी डोळे मिटून घेते....उष्ण थेंब ओघळतो गालावर....तिथेच वाळून जातो ....!लहान बाळाने हट्ट धरून अखेरीस रडता रडताच निजून जावं तसं हळूहळू निवत जातं मन...आणि स्पंजसारखं जड होत जातं...तो भार सोसत नाहीच जिवाला...! अरुणा बाईंची कविता व्यापून उरते..आपल्याच मनातलं हे असं उघड उघड सांगितलय बाईंनी असे वाटून ओशाळं होतं...आणि क्रुतद्नय ही वाटू लागतं.....! मनात ओळी उमलू लागतात... नाहीच कुणी आपुले रे प्राणांवर नभ धरणारे दि:काल धुक्याच्या समयी हृदयाला स्पंदविणारे......

Friday, 19 July 2013

Calligraphy-19.07.2013
आज आषाढी एकादशी । अक्षर वारीतील आजची रचना... संत तुकारामांची…

 A calligraphic tribute to Sant Tukaram. 

Thursday, 18 July 2013

Calligraphy-18.07.2013||अक्षरवारी- १८  ||
अक्षर वारीतील आजची रचना संत ज्ञानेश्वरांची .
A calligraphic tribute to Saint Dnyaneshwar. 

Wednesday, 17 July 2013

Calligraphy-17.07.2013||अक्षरवारी- १७ ||

अक्षर वारीतील आजची रचना... संत तुकारामांची…
 A calligraphic tribute to Sant Tukaram

Tuesday, 16 July 2013

Calligraphy-16.07.2013अक्षर वारीतील आजची रचना 
संत ज्ञानेश्वरांची . 

calligraphic tribute to Saint Dnyaneshwar.

Monday, 15 July 2013

Calligraphy-15.07.2013
||अक्षरवारी- १५ ||

अक्षर वारीतील आजची रचना... संत तुकारामांची…
 A calligraphic tribute to Sant Tukaram.

Sunday, 14 July 2013

Calligraphy-14.07.2013||अक्षरवारी- १४ ||

अक्षर वारीतील आजची रचना संत ज्ञानेश्वरांची .

 A calligraphic tribute to Saint Dnyaneshwar.

Saturday, 13 July 2013

Calligraphy-13.07.2013


अक्षरवारी- १३  ||
अक्षर वारीतील आजची रचना... संत तुकारामांची… A calligraphic tribute to Sant Tukaram

Friday, 12 July 2013

Calligraphy-12.07.2013||अक्षरवारी- १२ ||
अक्षर वारीतील आजची रचना संत ज्ञानेश्वरांची . 
मी माझे मोहित राहिले निवांत 
एकरूप तत्व देखिले गे माये 
द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं 
विश्वरूपें मिठी देत हरी 
छाया -माया -काया हरिरुपी ठायी
चिन्तिता विलया एक तेजी
ज्ञानदेवा पहा ओहमसोह्मभावा
हरिरूपी दुहा सर्वकाळ
A calligraphic tribute to Saint Dnyaneshwar

Thursday, 11 July 2013

Calligraphy-11.07.2013


||अक्षरवारी- ११ ||

अक्षर वारीतील आजची रचना... संत तुकारामांची…
 A calligraphic tribute to Sant Tukaram.

Wednesday, 10 July 2013

Calligraphy-10.07.2013

||अक्षरवारी- १०||
अक्षर वारीतील आजची रचना संत ज्ञानेश्वरांची . A calligraphic tribute to Saint Dnyaneshwar.

Tuesday, 9 July 2013

Calligraphy-09.07.2013

||अक्षरवारी- ९ ||
अक्षर वारीतील आजची रचना... संत तुकारामांची…
 A calligraphic tribute to Sant Tukaram. 

Monday, 8 July 2013

Calligraphy-08.07.2013
||अक्षरवारी-८ ||
अक्षर वारीतील आजची रचना संत ज्ञानेश्वरांची . 
A calligraphic tribute to Saint Dnyaneshwar. 

Sunday, 7 July 2013

Calligraphy-07.07.2013||अक्षरवारी- ७||

अक्षर वारीतील आजचा सातवा अभंग .. . संत तुकारामांची रचना … 
A calligraphic tribute to Sant Tukaram.

Saturday, 6 July 2013

Calligraphy-06.07.2013


||अक्षरवारी-६ ||
ज्ञानेश्वर हरिपाठातील २३ वा अभंग . नामस्मरणाचे महत्व सांगणारा … ह्या अभंगातून नाममार्ग आणि इतर मार्ग ह्याची तुलना करताना अष्टांगयोगातील सात पायऱ्या , पंचाग्नि साधकाचा मार्ग आणि तीन देहांचा निरास करून त्याच्या पलीकडे असलेल्या आत्म तत्वाशी एकरूप होण्याचा खडतर प्रवास ह्याचा संदर्भ देत ज्ञानेश्वर असे म्हणतात की याउलट नामस्मरणात कुठलाही धोके नाहीत , इतका सुलभ मार्ग असताना इतर कष्टप्रद मार्ग कशाला ? नाममार्ग हाच श्रेष्ठ
A calligraphic tribute to Saint Dnyaneshwar

Friday, 5 July 2013

Calligraphy-05.07.2013


अक्षर वारीतील आजचा पाचवा  अभंग ... संत तुकारामांची रचना  … 
A calligraphic tribute to Sant Tukaram

Thursday, 4 July 2013

Calligraphy-04.07.2013अक्षर वारीतील आजची रचना संत ज्ञानेश्वरांची .
 A calligraphic tribute to Saint Dnyaneshwar.

Wednesday, 3 July 2013

Calligraphy-03.07.2013अक्षर वारीतील आजचा अभंग संत तुकाराम महाराजांचा … 

A calligraphic tribute to Sant Tukaram. 

Tuesday, 2 July 2013

Calligraphy-02.07.2013


अक्षर वारीतील आज संत ज्ञानेश्वरांची रचना
पूर्वापार चालत आलेल्या रूढी ,परंपरा … त्या स्वीकाराव्यात की झुगारून द्याव्यात ह्या प्रश्न सतत पडत राहतो . ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात ह्या संदर्भात विवेचन करताना  संत ज्ञानेश्वरांनी असे लिहिले आहे की " तैसे ज्ञानीये जे होती । ते वेदार्थाते विवरिती । मग अपेक्षित ते स्वीकारिती । शाश्वत ते ॥ 
सूर्य उगवला कि संपूर्ण विश्व प्रकाशमान होते .त्यावेळी जगातील सर्व रस्ते डोळ्यांना दिसू लागतात म्हणून प्रत्येक रस्ता आपण पायाखाली घालत नाही , तर आपल्याला जिथे जायचे त्या ठिकाणी पोहोचवणारा मार्गच आपण निवडतो . तसेच पृथ्वी पाण्याने भरून गेली तर , केवळ उपलब्ध आहे म्हणून सगळे पाणी आपण पिणार नाही तर , आपली तहान भागवण्याइतकेच पाणी आपण ओंजळीने घेऊ त्याच न्यायाने विवेकी मनुष्य वेदार्थांचा धांडोळा घेतो , त्यातील कालसापेक्ष भाग वगळून जो शाश्वत आहे त्यातील अपेक्षित तेवढाच अंगीकारतो 

( संदर्भ: अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जें - अभय टिळक )