Friday 30 November 2012

Calligraphy-30.11.2012




आपल्या साहित्याने रसिकांना भरभरून आनंद देणारे आनंद यात्री कवी बा. भ. बोरकर( बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांचा आज  जन्मदिवस .  
३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यामधील कुडचुडे या गावी जन्मलेल्या बोरकरांचे  बरेचसे  शिक्षण पोर्तुगीजमधे झाले. पोर्तुगीज टीचर्स ट्रेनिंग प्रमाणपत्र परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते.  मॅट्रिकनंतर खर्च झेपणार नाही म्हणून त्यांना शिक्षण सोडावे लागले. टीचर्स डिप्लोमा घेतल्यामुळे त्यांना  पोर्तुगीज मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. नंतरच्या काळात आमचा गोमंतक, पोर्जेचो आवाज या वृत्तपत्रांचे ते संपादक होते. पुढे पुणे-पणजी आकाशवाणीवर त्यांची नियुक्ती झाली. आकाशवाणीमध्येच १९७० पर्यंत काम करून ते निवृत्त झाले.


 बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरणाचा , गोवा , कोकणातील निसर्गाचा  झालेला खोल परिणाम  त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो. निसर्ग सौन्दर्याबरोबरच , स्त्री सौंदर्य , प्रेमभावना हेदेखील त्यांच्या कवितांचे प्रमुख विषय .  नादमय व  छंदोबद्ध रचनेमुळे त्यांच्या कवितांचा  मराठी रसिकांवरअसलेला पगडा आजही कायम आहे. ११ काव्यसंग्रह, ४ कादंबऱ्या , २ कथासंग्रह,६ अनुवाद आणि कोकणी साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या आनंदभैरवी, चित्रवीणा, गितार, आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. १९६७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आले
A calligraphic tribute to Poet Ba Bh Borkar

Thursday 29 November 2012

Calligraphy-29.11.2012

जेष्ठ गझलकार आणि कवी सुरेश भट ह्यांची ही " असेच हे" ही रचना 

असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे... नसायचे

असेच सोससोसता


हसून हासवायचे;
असेच हासहासता
हळूच विव्हळायचे



असाच राहणार मी
जिता तुरुंग आपुला,
अशाच बाळगीन मी
सुटावयास श्रृंखला



असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका

अशीच येथली दया
हवेत चाचपायची;
अशीच जीवनास ह्या
पुन्हा क्षमा करायची

असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा

असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्या हव्या क्षणासही
नको नको म्हणायचे

असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे

कवी - सुरेश भट 

Wednesday 28 November 2012

Calligraphy-28.11.2012

थोर समाजसुधारक आणि सामजिक विचारवंत महात्मा जोतीबा फुले ह्यांची ही रचना. जातीनिर्मुलनासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा फुलेंचा  संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी स्वतः अतिशय सुरेख  अभंग रचले.
Today's calligraphic tribute to Mahatma Jyotirao Phule.

Tuesday 27 November 2012

Calligraphy-27.11.2012

जेष्ठ  कवी  बी रघुनाथ ( भगवान रघुनाथ कुळकर्णी ) ह्यांची " सांज " ही कविता . १९१३ साली परभणी जिल्ह्यात सातोना गावी  जन्मलेल्या भगवान कुलकर्णी ह्यांनी वयाच्या १७ व्या वर्षीपासून साहित्य लेखनाला प्रारंभ केला . दुर्दैवाने वयाच्या ४० व्या वर्षीच निधन पावलेल्या ह्या कवीने कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार अतिशय समर्थपणे हाताळले."आलाप आणि विलाप " तसेच "पुन्हा नभाच्या लाल कडा " हे काव्यसंग्रह , ५ कथासंग्रह ,७ कादंबऱ्याचे लेखन केले . 
Today's calligraphic tribute to Poet B. Raghunath 

Monday 26 November 2012

Calligraphy-26.11.2012

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांच्या " जिप्सी " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता 
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar

Sunday 25 November 2012

Calligraphy-25.11.2012

नाट्याचार्य  काकासाहेब अर्थात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर  ह्यांची " संगीत मानापमान " ह्या नाटकातील रचना . २५ नोव्हे.१८७२ रोजी सांगली येथे जन्मलेले कृ .प्र.खाडिलकर ,पारतंत्र्याच्या काळातील राष्ट्रीय संघर्षाच्या काळात  , लोकमान्य टिळकांच्या सहवासात आले आणि  पत्रकार म्हणून आपले विचार 'केसरी' च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले . खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. ज्वलंत देशप्रेम आणि सडेतोड विचार प्रग होत असतानाच  त्याच काळात खाडिलकरांनी 'संगीत स्वयंवर' 'संगीत मानापमान' संगीत विद्याहरण ,संगीत द्रौपदी अशी एकंदर १५  अजरामर नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध केले.

Saturday 24 November 2012

calligraphy-24.11.2012

विज्ञानावर विश्वास दर्शविताना निष्क्रिय भक्तीवर भाष्य करणारा विंदा करंदीकर ह्यांचा "सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय " हा अभंग  . विज्ञानाची कास धरत सत्यज्ञान सांगणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव करताना सामान्य माणसाने जुनी मुल्ये स्वतः नीट पारखून घेतली पाहिजेत,कुठल्याही गुरूकडे आपली बुद्धी गहाण  टाकू नये हे सांगणारी रचना . प्रयत्नवादाचा  पुरस्कार करताना विंदा करंदीकर शेवटी असे म्हणतात की सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय । तेव्हा जन्म होय धन्य धन्य |
Today's calligraphic tribute to Poet Vinda Karandikar for his abhang Satgurwachoni Sapadel Soy

Friday 23 November 2012

Calligraphy-23.11.2012

कुसुमाग्रज ह्यांच्या " स्वगत " ह्या काव्यसंग्रहातील "बंडखोर " ही कविता . समाजातील अन्याय, दास्य, दैन्य, विषमता यांच्याविरुद्ध प्रहार करणाऱ्या , त्यासाठी संघर्ष करणाऱ्या बंडखोरांविषयी लिहिताना कुसुमाग्रज असे लिहितात की बंडखोर हे असे कलंदर , जनात राहुनी हे वनवासी , ईश्वर जेथे भुलतो चुकतो सावरती हे तिथे तयासी.
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj

Thursday 22 November 2012

Calligraphy-22.11.2012

जेष्ठ साहित्यिका आणि कवयित्री अरुणा ढेरे ह्यांची मंत्राक्षर ह्या काव्यसंग्रहातील " माझ्या मित्रा " ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poetess Dr.Aruna Dhere

Wednesday 21 November 2012

Calligraphy-21.11.2012


मराठी साहित्यातील अलौकिक प्रतिभासंपन्न  कवी ग दि माडगूळकर ह्यांची त्यांच्या " पूरिया " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता. Today's calligraphic tribute to Poet Ga Di Madgulkar's poem from his collection Pooriya..

Tuesday 20 November 2012

Calligraphy-20.11.2012


कवी ग्रेस ह्यांची ही कविता. ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा.
कविवर्य ग्रेस यांच्यावर काही आलोचकांनी आरोप केला आहे की त्यांच्या कविता आत्मकेंद्रित आहेत.त्यांत सामाजिक बांधिलकी नाही.यावर त्यांचे उत्तर असे :
" मी कविता करतो..
सुबोध की दुर्बोध ते ठाऊक नाही;
पण ....
एक ठाऊक आहे .
तुम्ही जगता ते मी लिहितो ....
तुम्ही बोलता ती भाषा मी वापरतो .... '
आणि त्यांच्या कवितेचे सखोल अध्ययन केल्यावर याची सत्यता पटेल.त्यांनी कित्येक [माझ्या मते कमीतकमी१४कविता] अशा लिहिल्या आहेत ज्यात सामाजिक बांधिलकी स्पष्ट दिसून येते. माणसाने स्वत:च्या स्वार्थाकरता निसर्गाच्या क्रियाकलापात बाधा उत्पन्न करून स्वतःकरता संकटे कशी निर्माण करून घेतली आहेत याचा इशारा 'पद्मबंध' नामक कवितेत ग्रेसने दिला आहे .'घाटातुन घंटांचे घोर नाद थरथरती;' कवितेतील हा उल्लेख संध्याकाळी शंकराच्या मंदिरात वाजणाऱ्या घोर घंटानादाचा आहे व तो शंकराच्या तांडव नृत्याने सृष्टीचा संहार होण्याचा द्योतक आहे. पर्यावरण नाश म्हणजे सृष्टीचा संहारच.
"मध्यान्ह बावरे पक्षी." या प्रस्तुत कवितेतही माणसाने निसर्गाच्या विपरीत क्रियाकलापामुळे पर्यावरण संतुलन बिघडल्याने पक्ष्यांवर आणि ग्रामीण वस्तीवर किती विपरीत परिणाम झाला आहे हे दर्शविले आहे..
मध्यान्ह बावरे पक्षी
जे उधळुनी गेले अंबर
ते पक्षीच आता म्हणती
हे पंखहि माझे नश्वर ...
पारांची गावे तेह्वा
संध्येवर धूप उजळती
प्रत्येक घरातुन एक हलते
मिणमिणती एकट पणती ...
गाईंची गोरज धूळ
करुणाघन त्यांचे डोळे
बांधावर हंबर देती
वासरे मुकी वेल्हाळे ..
डोळ्यातिल स्वप्नतळांना
संध्येचा घुंगुरवाळा
क्षितिजावर तरिही झुलती
बगळ्यांच्या मोहनमाळा ...
माणसाने नैसर्गिक साधन संपत्तीचा विनाश केल्याने पक्षांना आपले भक्ष्य शोधण्यासाठी आणि आसर्‍यासाठी स्थळे शोधण्यासाठी निरंतर उडावे लागते. पूर्वी दुपारच्या वेड लावणाऱ्या उन्हातही आकाशात उडणारे पक्षी आता म्हणू लागले आहेत की आता आमच्या पंखांचा नाश होण्याची वेळ ही आली आहे.तसेच जी गावे पूर्वी संध्याकाळी गजबजलेली असायची ती आता ओसाड झाल्यासारखी वाटतात कारण वस्तीतील लोक गाव सोडून गेली आहेत.
पूर्वीच्या गावातली संध्याकाळी जंगलातून घरी येणाऱ्या गाईंची गोरज धूळ , आपल्या वासरांच्या भेटी साठी करुणेने भरलेले त्यांचे डोळे आणि तिची गोठ्यात बांधलेली हम्बरणारी सुंदर वासरे आठवतात.
माणसाच्या संहारक प्रवृतींचा पक्ष्यांना ही इशारा मिळाला आहे तरीही त्याची भीती न बाळगता त्यांचे निसर्गदत्त क्रियाकलाप चालूच आहेत आणि माणूस निसर्गाची पर्वा न करता विनाशाच्या मार्गावर जात आहे.

Monday 19 November 2012

Calligraphy-19.11.2012

पिचलेल्या मराठी माणसाला ताठ मानेने जगायला सांगणाऱ्या आणि ताठ मानेने जगण्यासाठी  संघर्ष करायला शिकवणाऱ्या  बाळासाहेब ठाकरे ह्यांना कवी अशोक बागवे ह्यांच्या शब्दातील  आदरांजली . 
A calligraphic tribute to Balasaheb Thackeray 
( Poet : Ashok Bagwe)

Sunday 18 November 2012

Calligraphy-18.11.2012

                 जेष्ठ कवयित्री इंदिरा संत ह्यांची प्रळ्याच्या पैल  ही कविता.
Today's calligraphic tribute to Poetess Indira Sant

Saturday 17 November 2012

Calligraphy-17.11.2012

सध्याचे आघाडीचे गझलकार आणि गीतकार चन्द्रशेखर सानेकर ह्यांची ही रचना . 
Today's calligraphic tribute to Poet Chandrashekhar Sanekar

Friday 16 November 2012

Calligraphy-16.11.2012


अतिशय मोजक्या पण सुरेख कविता लिहिणारे जेष्ठ कवी तुळशीराम काजे ह्यांची ही कविता. १९३२ साली अमरावती जिल्ह्यातील पुसनेर येथे शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या श्री काजे ह्यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी साहित्य आणि अध्यापन शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना , त्यांच्या कविता सत्यकथा, छंद,मौज,प्रतिष्ठान सारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाल्या आणि  मराठी वाचकापर्यंत पोहोचल्या. 
Today's calligraphic tribute to Poet Tulshiram Madhavrao Kaje 

Thursday 15 November 2012

Calligraphy-15.11.2012


विवेकाचा गुण अंगी बाणवून घेण्या साठी योग्याने नेहमी अविवेकाची काजळी स्वच्छ केली पाहिजे तरच तो निरंतर विचारांची दिवाळी साजरी करू शकेल. ज्ञानेश्वरी तील चवथ्या अध्यायातील हा ५४ वा अभंग.. दीपावलीच्या शुभेच्छा 

Wednesday 14 November 2012

Calligraphy-14.11.2012


आज दिवाळी पाडवा... मांगल्याचा .. तेजाचा .. प्रकाशाचा सण... पण कालपासून एक विचित्र  अनुभवतो आहे.. सांगलीच्या रस्त्यावर पेटलेले टायर्स... आपल्या  कष्टाने उस पिकवणारा शेतकरी उस दरा संदर्भात रस्त्यावर उतरला आहे.. राज्य कर्त्या विरुद्ध घोषणाबाजी करतोय... त्यांना रोखण्यासाठी..हातात काठ्या घेतलेले पोलीस.....सर्वत्र  फटाक्याच्या धुरा ऐवजी पेटलेल्या टायर्सचा धूर ... रांगोळी ऐवजी गाड्यांच्या तुटलेल्या काचा.. रस्त्यावर ,माझ्याबरोबर अडकलेली सामान्य माणसे....स्वतःच्या गावात  पहिल्यांदाच पाहिलेला  ,अनुभवलेला हा दिवाळीचा अनपेक्षित  क्षण. हे सर्व उघड्या डोळ्याने पाहतोय.. हे सर्व कुठतरी थांबावे.. सर्वत्र " आनंद वन भुवनी " व्हावे.. हे वाटत असताना आठवलेली प्रा. वसंत बापट ह्यांची ही कविता... दीपावलीच्या सर्वाना शुभेच्छा 

Tuesday 13 November 2012

Calligraphy-13.11.2012

                  कवी दासू वैद्य ह्यांची दीप प्रज्वलन ही कविता..सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा.
Today's calligraphic tribute to Poet Dasu Vaidya
Wish you a Happy Diwali

Monday 12 November 2012

Calligraphy-12.11.2012

आज विंदा करंदीकरांची " घेता " ही अतिशय प्रसिद्ध असलेली कविता.. लहानपणी शालेय जीवनात शिकलेली ही कविता.. पण नंतर " संहिता" ह्या  विंदा करंदीकरांच्या निवडक कवितांच्या पुस्तकात कवी मंगेश पाडगावकर ह्यांनी ह्या कवितेचे अतिशय सुंदर असे विश्लेषण लिहिले आहे.. माळा कडून हिरवी पिवळी शाल घ्यावी म्हणजे सौंदर्य घ्यावे... सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी म्हणजे शौर्याची प्रेरणा घ्यावी.. नाना आकार धारण करणाऱ्या ढगाकडून कलाकृती निर्माण करणाऱ्या कलावंतानी प्रेरणा घ्यावी... रक्तामधल्या प्रश्नासाठी म्हणजे नैसर्गिक प्रेरणे मधून निर्माण होणाऱ्या प्रश्नांसाठी जीवनातून ,जगण्यातून उत्तरे शोधावीत.. आयाळ हे पराक्रमाचे प्रतिक ... ह्या पराक्रमाची प्रेरणा उसळेल्या दर्याकडून घ्यावी... तुकोबाची माळ हे आंतरिक शांतीचे प्रतीक... संत परंपरेशी निगडीत असलेल्या भीमेकडून ही शांती मिळावी.. देणाऱ्याने देत जावे.. घेणाऱ्याने घेत जावे.. शब्द कोणताही वापरला तरी या देणाऱ्याची एक खूण आहे आणि ते म्हणजे हे दान अमाप आहे आणि आपण देतो आहोत ह्या जाणीवेशिवाय दिलेले हे दान  निर्मळ आहे.. अशा निर्मळ वृत्तीने जर देता आले तर माणसाचे जीवन कृतार्थ होईल . देणाऱ्याचे हात हे या निर्मळ वृत्तीचे प्रतीक आणि म्हणूनच " घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असे करंदीकर सांगतात.
Today's calligraphic tribute to Vinda Karandikar's beautiful poem " Gheta.. 

Sunday 11 November 2012

Calligraphy-11.11.2012

मराठी साहित्यातील स्वतःचे एक युग निर्माण करणाऱ्या गोविंदाग्रज (कै राम गणेश गडकरी) ह्यांची " एखाद्याचे नशीब " ही " शार्दुल विक्रीडीत " ह्या वृत्तामध्ये लिहिलेली कविता.. वाग्वैजयंती हा कै . गडकरी ह्यांचा  एकमेव काव्यसंग्रह. मुक्तछंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी सहज  हाताळले . 

Saturday 10 November 2012

Calligraphy-10.11.2012

शालेय जीवनातील एक  आठवणीतील कविता ... जेष्ठ कवी कै ग ह पाटील ह्यांची " देव" हे  प्रार्थनागीत.

Friday 9 November 2012

Calligraphy-09.11.2012



कवी अनिल ( आत्माराम रावजी देशपांडे ) ह्यांची ही कविता..कवी अनिलांना "मुक्तछंद  काव्याचे प्रवर्तक "म्हणून मानले जायचे, कवितेच्या रचनेची  विशिष्ठ बांधणी , ठराविक शैली न मानता काव्यलेखन करणाऱ्या कवी अनिलांनी " अजुनी रुसून आहे , वाटेवर काटे वेचीत चाललो अशी अजरामर गीतेही लिहिली . 
Today's calligraphic tribute to Poet Anil ( Atmaram Ravaji Deshpande )

Thursday 8 November 2012

Calligraphy-08.11.2012

आज ८ नोव्हेंबर.. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे ह्यांचा जन्मदिवस... आपल्या बहुरंगी व्यक्तिमत्वाने रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणाऱ्या पु लंनी संगीतबद्ध केलेला व निर्मित केलेल्या " गुळाचा गणपती" ह्या चित्रपटातील हे  गीत. . ग दि माडगुळकर ह्यांनी लिहिलेल्या गीताला भीमसेन जोशी ह्यांचा स्वर लाभला आहे.( ह्या गीताच्या रेकॉर्डिंग वेळी ऐनवेळी ऑर्गनवादक आलाच नाही.. पुल ,भीमसेन  विचारात असताना त्यांचे मित्र आणि जेष्ठ गायक वसंतराव देशपांडे धावून आले ..अणि त्यांनी ह्या गीतासाठी स्वतः ऑर्गन वाजवला)  

Wednesday 7 November 2012

Calligraphy- 07.11.2012

आज ७ नोव्हेंबर ..प्रतिभावान लेखिका सुनीता देशपांडे ह्यांचा आज स्मृतीदिन . थोड्या उशिराने लेखनास सुरवात करणाऱ्या सुनीताबाईनी " मण्यांची माळ, मनातल आकाश , सोयरे सकळ ,समांतर जीवन ही ललित लेखन पर पुस्तके लिहिली. त्यांच्या " आहे मनोहर तरी.." ह्या पुस्तकाची हिंदी , कन्नड,गुजराथी आणि इंग्रजी मध्येही भाषांतरे झाली." प्रिय जी ए"  हे  त्यांच्या आणि प्रख्यात लेखक जी ए कुलकर्णी ह्यांच्यातील अतिशय सुंदर असा पत्रसंवादपर पुस्तकही गाजले.  

अतिशय शिस्तप्रिय , स्पष्टवक्तेपणाचा अनुभव मला त्यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीत  मला आला खरा .. पण तितक्याच जिव्हाळ्याने त्यानी दुसरे दिवशी , पुलं ची भेट घडवून दिली... 
 आरती प्रभू, बा, भ.बोरकर आणि  बा सी मर्ढेकरांच्या कवितांवर त्यांनी पुलंच्या   साथीने अनेक काव्यवाचनाचे प्रयोग केले.. त्यंच्याकडून आरती प्रभूंची कविता ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असे... 
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजची  ही आरती प्रभूंची कविता.. 

Tuesday 6 November 2012

Calligraphy-06.11.2012

जेष्ठ कवयित्री शान्ता शेळके ह्यांच्या "गोंदण" ह्या काव्यसंग्रहातील ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poetess Shanta Shelke's poem Ekaki from her collecion "Gondan"

Monday 5 November 2012

Calligraphy-05.11.2012

.
 आज ५ नोव्हेंबर..मराठी रंगभूमी दिन. कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे " सीता स्वयंवर " ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.. मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले.. १७० वर्षाची ही रंगभूमीची  परंपरा..आजही २१ व्या शतकातल्या गतिमान युगात , जोपासली जात आहे.
ह्या १७० वर्षातील  सर्व ज्ञात , अज्ञात कलावंत,तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वाना आजचा सुलेखनाद्वारे सलाम 

Sunday 4 November 2012

Calligraphy-04.11.2012

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांच्या "गझल" ह्या काव्यसंग्रहातील ही रचना.
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar

Saturday 3 November 2012

Calligraphy-03.11.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या महावृक्ष ह्या काव्यसंग्रहातील " निवारा" ही कविता... 
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj's poem Niwara 

Friday 2 November 2012

Calligraphy-02.11.2012




जेष्ठ गझलकार सुरेश भट ह्यांची " एल्गार " ह्या काव्यसंग्रहातील ही रचना..
जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही
तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही

Today's calligraphic tribute to Poet Suresh Bhat. 

Thursday 1 November 2012

Calligraphy-01.11.2012


कवी ग्रेस ह्यांच्या " चंद्रमाधवीचे प्रदेश " ह्या  काव्यसंग्रहातील ही कविता.
 कवी ग्रेस ह्यांच्या ह्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा.. 
मर्म [चंद्रमाधवीचे प्रदेश]

ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
असे उणे नभ
...ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये

धर्म म्हणजे खरे काय याचा शोध कोणी करत नाही. प्रत्येक धर्मावलंबी धर्म म्हणजे त्याचे स्वतःचे मतसम्प्रदाय अथवा पंथ आहे हे समजून धर्माची व्याख्या करत असतो पण संकुचित उपासना पद्धति म्हणजे 'धर्मनाही. धर्म म्हणजे 'धारणकरणे.जीवनातले शाश्वत नियम पालन करणे हाच खरा धर्म. धर्माचे स्वरूप आकाशा प्रमाणे विस्तृत आहे पण त्याचे सुप्त स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कोणी करत नाही.