Thursday 14 February 2013

Calligraphy-14.02.2013

आज १४ फेब्रुवारी .. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या " प्रेमयोग " ह्या कवितेतील ह्या काही निवडक ओळी .... छंदोमयी ह्या काव्यसंग्रहातील ही एक अप्रतिम कविता ..


प्रेम कुणावर करावं ?

कुणावरही करावं ..

प्रेम 
राधेच्या वत्सल स्तनांवर करावं 
कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं 
भीष्म द्रोणांच्या थकलेल्या चरणांवर करावं 
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं 
प्रेम कुणावरही करावं ..
प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं ..
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं ..
बासरीतून पाझरणाऱ्या 
सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं ..
यमुनेचा डोह जहरुन टाकणाऱ्या 
कालियाच्या फण्यावरही करावं 
प्रेम कुणावरही करावं ..

प्रेम 
रुक्मिणीच्या लालस ओठावर करावं 
वक्रतुण्डच्या हास्यास्पद पोटावर करावं 
मोराच्या पिसाऱ्यातील 
अद्भुत लावण्यावर करावं 
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं 
अन खड्गाच्या पात्यावर ही करावं 
प्रेम कुणावरही करावं ..

प्रेम 
गोपींच्या मादक लीलांवर करावं ..
पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं ..
यशोदेच्या दुधावर करावं ..
देवकीच्या आसवांवर करावं ..
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील 
नांगराच्या फाळावर करावं ..
कंसाच्या काळजातील 
द्वेषाच्या जाळावर करावं ..

प्रेम 
ज्याला तारायच 
त्याच्यावर तर करायचं 
पण ज्याला मारायचं 
त्याच्यावर ही करावं 

प्रेम योगावर करावं 
प्रेम भोगावर करावं 
आणि त्याहूनही अधिक 
त्यागावर कराव 

प्रेम 
चारी पुरुषार्थांची  झिंग देणाऱ्या 
जीवनाच्या दवावर करावं 
आणि पारध्याच्या बाणान घायाळ होऊन 
अरण्यात एकाकी पडणाऱ्या 
स्वतःच्या शवावर ही करावं 
कारण 
प्रेम आहे माणसाच्या 
संस्कृतीचा सारांश 
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष 
आणि भविष्यकालातील 
त्याच्या अभ्युदयाची आशा 
एकमेव 

1 comment:

  1. थँक्स मिस्टर लिमये, आपला मी अत्यंत आभारी आहे.

    ReplyDelete