Saturday 22 June 2013

Calligraphy-22.06.2013


कवी ग्रेस ह्यांची ‘निळाई’ ही कविता. आणि श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा  
“असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले
"असे रंग आणि ढगांच्या किनारी “

निळे सूर आणि निळी गीतशाळा 
निळाईत आली सखीची सखी 
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची 
भिजेना परी ही निळी पालखी … 
किती खोल आणि किती ओल वक्षी 
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे 
प्राणातले ऊन प्राणात गेले 
तुझ्या सागराची निळी तोरणे 
ग्रेस यांना निळाईचे फार आकर्षण होते..त्यांनी आपल्या बर्‍याच कवितात निळे, निळी निळाई या शब्दांचा प्रयोग केला आहे परंतु या सर्व निळाईत उदासीनता आणि दु:खाची छाया नेहमीच पसरलेली दिसेल.ग्रेस साठी 'निळे' हे दु:ख आणि उदासीनतेचे प्रतीक आहे.. . 'असे रंग आणि ढगांच्या किनारी' या कवितेत निळ्या आकाशात प्रतिक्षण बदलणार्‍या ढगांच्या रंगांचे आणि चित्रविचित्र आकृतींचे अद्भुत वर्णन केले आहे.त्या आकृती कधी घाटमाथे, कधी राउळ ,कधी पाउलवाटा, कधी पाखरे या रुपात दिसतात पण त्याच्यातही उदासीनतेची छाया आहे.त्यांनी अस्तकालीन सूर्यनारायणास दुक्ख दूर करण्याची ही प्रार्थना केली आहे.
निळ्या आकाशातील प्रत्येक क्षणी बदलणार्‍या ढगात आणि विविध रंगात मला दुःखाच्या उन्हाचाच भास होत आहे.पहाडी घाटांवर वस्ती करणार्‍या लोकांचे जीवन बघून माझ्या डोळ्यांत पाणीच येते.त्यांच्या येण्याजाण्याच्या पाऊलवाटा मंदार वृक्षांच्या काट्यांप्रमाणे भरलेल्या आहेत.सर्वत्र पसरलेल्या धुक्याने त्यांचा संपर्क जगाशी तुटलाच आहे. हे अस्तकालीन सूर्यनारायणा !, तू अंधार दूर करून त्यांचे दुःख दूर कर अशी किती प्रार्थना करू ? संध्याकाळ झाली आणि नदी तलावाकडून थंड वारे येऊ लागले.चंद्र उदय होणार म्हणून संध्या डोलू लागली आहे संध्याकाळ झाल्यामुळे पक्ष्यांचे थवे थकून आपल्या घरट्यांकडे परतत आहेत.त्यांची आजची भूक भागली पण त्यांना उद्याच्या दुःखाची चिंता लागलेलीच आहे.

1 comment:

  1. magachya varshiche ani hya varshiche hya kaviteche lekhan chan vatat aahe

    ReplyDelete