आज ८ मार्च …. ज्येष्ठ कवी आरती प्रभु ह्यांचा जन्मदिन …. त्या निमित्त त्यांच्या " दिवेलागण " ह्या काव्यसंग्रहातील कविता … ' ये रे घना ….
आरती प्रभुना सुरुवातीच्या ह्या पहिल्या ओळी सुचल्या त्या १९५७-५८ साली , पण ह्या शब्दाच्या पुढे संपूर्ण कविता सुचायला मात्र बरीच वर्षे गेली…
पुढे मग आरती प्रभु कोकणातलं कुडाळ गाव सोडून मुंबईला आले. मुंबई नभोवाणीवर नोकरी करू लागले . मंगेश पाडगावकर त्या वेळी कार्यक्रम अधिकारी होते. एके दिवशी आकाशवाणीवर बिस्मिल्ला खाँच्या सनईवादनाचं ध्वनिमुद्रण होतं. पाडगावकरांच्या आग्रहामुळे स्टुडिओत बसून आरती प्रभु ते वादन ऐकत होते. सनईचे सूर ऐकता ऐकता ‘ये रे घना, ये रे घना’ कविता सुचत गेली … कडवं पूर्ण झालं आणि दोन- दोन शब्दांच्या सोळा ओळींच्या कवितेची निर्मिती झाली.‘दिवेलागण’ या संग्रहातही ही कविता एवढीच होती
येरे घना
येरे घना,
न्हावूं घाल
माझ्या मना
फुले माझी
अळुमाळू
वारा बघे
चुरगळू
नको नको
म्हणताना
गंध गेला
रानावना
येरे घना
येरे घना,
न्हावूं घाल
माझ्या मना
पुढे ह्या कवितेला , श्री . हृदयनाथ मंगेशकरांनी अतिशय सुरेल चाल दिली… त्यावेळी ह्या कवितेचा परत विस्तार आरती प्रभुनी केला…
टाकुनिया घरदार
नाचणार नाचणार
नको नको म्हणताना
मनमोर भर राना
नको नको किती म्हणू
वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाटय़ाचा
वारा मला रसपाना
ज्येष्ठ कवियित्री अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या एका लेखात ह्या कवितेबद्दल लिहिताना असे लिहिले आहे की …
ये रे घना, ये रे घना, न्हावूं घाल माझ्या मना.. कोण म्हणतं आहे हे? ही कुणाची आळवणी आहे?आरती प्रभूंनी स्वत:च हे प्रश्न विचारले आहेत. ही आळवणी का सुरू आहे? कशासाठी? कुणासाठी? आणि ही आळवणी करतंय तरी कोण? खरंच, ही आळवणी त्यांची आहे? आरती प्रभू नावाच्या कवीची? की त्यांच्या कवितेचा अंत:स्वर जागा करणाऱ्या संगीतकाराची? की कवितेची स्वत:चीच?
वाटतं की, ही प्रत्येक माणसाची सदाचीच आळवणी आहे. आपली तगमग शमावी, दाह शांत व्हावा, जगण्याचा ओला गारवा आतपर्यंत झिरपत जावा, भिजावं मन यासाठी तान्हेल्या प्रत्येकाची आळवणी. तुमच्या-माझ्या मनात खोलवर सारखीच उमटत असलेली साद जणू आरती प्रभूंनी कविता होऊन प्रत्यक्ष घातली गेली आहे. आणि असं जर आहे, तर ही कविता पुरी झालेली नाहीच. प्रत्यक्षात ती जशी सुरुवातीला प्रसिद्ध झाली तेव्हा थोडी पूर्ण झाली, मग तिचं गाणं झालं तेव्हा आणखी पूर्ण झाली, मग तिचा गाण्यासाठी विस्तार झाला तेव्हा तिला अधिकच पूर्णता आली, तशी भिजण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येकाच्या मनात ती सारखी नव्यानं पूर्ण होत राहणार आहे.. आणि तोवर ती अपूर्णच राहणार आहे. एखादी कविता अपूर्णतेचं असंही वरदान घेऊन येते! ते तिचं भाग्य असतं, कवीचं भाग्य असतं आणि रसिकांचंही.
No comments:
Post a Comment