कवयित्री क्रांति साडेकर ह्यांची " अलख" ही कविता . वृत्तबद्ध कवितांचा आग्रह आणि सखोल चिंतनातून कविता लिहिणाऱ्या या भाव कवयित्रीचे 'असेही तसेही ' आणि 'अग्निसखा ' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत
अलख
हा अलख कुणा जोग्याचा
ही गहन कुणाची वाणी?
प्राणांच्या कंठी रुजली
संध्यापर्वाची गाणी
झाकोळुन नभ गंगेच्या
पाण्यात उतरले थोडे
क्षितिजाच्या पार निघाले
अन् सूर्यरथाचे घोडे
त्या मूक, उदास जलावर
धूसर वलये वाटोळी
रेखाटत बसली कुठल्या
कवितेच्या अनवट ओळी?
ज्या सांद्र वनातुन घुमले
अस्वस्थ क्षणांचे पावे
ते वन सोडून निघाले
अज्ञात दिशेला रावे
ढळत्या सांजेच्या पदरी
अस्फुटसा लुकलुक तारा
परतून चालला जोगी
अन् अलख घुमवितो वारा
क्रांति
A calligraphic tribute to Poetess Kranti Sadekar
No comments:
Post a Comment