Saturday 1 December 2012

Calligraphy-01.12.2012


मराठीतील एक युगप्रवर्तक कवी, साहित्यिक बा सी मर्ढेकर ( बाळ सीताराम मर्ढेकर) ह्यांची ही कविता .खानदेशातील फैजपूर येथे १ डिसेंबर १९०९ रोजी त्यांचा जन्म झाला. धुळे येथे मॅट्रीकपर्यतचं शिक्षण घेतल्यावर पुण्यातील फ़र्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवी प्राप्त केली.  त्यांनतर काही काळ त्यांनी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून आणि महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापक म्हणून कार्य केलं. आणि १९३८ साली त्यांनी आकाशवाणीत नोकरी केली.मर्ढेकरांची नवकविता  यंत्रयुगातील मानवाची  घुसमट मराठी कवितेतून प्रथमच जाणवली.  त्यामुळेच मर्ढेकरांच्या निर्मितीला वाड्.मयीन घटना आणि त्यांच्यापासूनच्या साहित्यिक कालखंडाला 'मर्ढेकर युग'मानलं जातं.  'गणपत वाणी बिडी पितांना'  'पिपात मेले, ओल्या उंदीर सारख्या कविता लिहिणाऱ्या मर्ढेकरांनी  , 'भंगू दे काठिन्य माझे' सारखी कविता लिहून  करुणा ही भाकली .मर्ढेकरांचे हे जणू पसायदानच आहे

भंगु दे काठिन्य माझे 


भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाऊं दे मनींचे;

येऊ दे वाणीत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.

ज्ञात हेतूतील माझ्या
दे गळू मालिन्य,आणि
माझिया अज्ञात टाकी
स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे.

राहु दे स्वातंत्र्य माझे
फक्त उच्चारातले गा;
अक्षरा आकार तूझ्या
फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.

लोभ जीभेचा जळू दे
दे थिजु विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्व माझ्या
लाभु दे भाषा शरीरा.

जाऊ दे कार्पण्य ’मी’चे
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्रकाट्य़ाची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेउं दे तीतून माते
शब्द तूझा स्पंदनाचे

त्वसृतीचे ओळखू दे
माझिया हाता सुकाणू;
थोर यत्ना शांति दे गा
माझिया वृत्तीत बाणू.

आण तूझ्या लालसेची;
आण लोकांची अभागी;
आणि माझ्या डोळियांची
पापणी ठेवीन जागी.

धैर्य दे अन्‌ नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकुं दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे;

घेऊ दे आघात तीते
इंद्रियद्वारा जगाचे;
पोळू दे आतून तीते
गा अतींद्रियार्थांचे 

आशयाचा तूच स्वामी
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही;
आणि देणारा मुरारी.


काय मागावे परी म्यां

तूहि कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्‌
तूंच घेणारा स्वभावे!!

- बा. सी. मर्ढेकर




1 comment:

  1. Could you please look into this post again? संपूर्ण किवता िदसत नाहीये.

    ReplyDelete