Tuesday 20 November 2012

Calligraphy-20.11.2012


कवी ग्रेस ह्यांची ही कविता. ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा.
कविवर्य ग्रेस यांच्यावर काही आलोचकांनी आरोप केला आहे की त्यांच्या कविता आत्मकेंद्रित आहेत.त्यांत सामाजिक बांधिलकी नाही.यावर त्यांचे उत्तर असे :
" मी कविता करतो..
सुबोध की दुर्बोध ते ठाऊक नाही;
पण ....
एक ठाऊक आहे .
तुम्ही जगता ते मी लिहितो ....
तुम्ही बोलता ती भाषा मी वापरतो .... '
आणि त्यांच्या कवितेचे सखोल अध्ययन केल्यावर याची सत्यता पटेल.त्यांनी कित्येक [माझ्या मते कमीतकमी१४कविता] अशा लिहिल्या आहेत ज्यात सामाजिक बांधिलकी स्पष्ट दिसून येते. माणसाने स्वत:च्या स्वार्थाकरता निसर्गाच्या क्रियाकलापात बाधा उत्पन्न करून स्वतःकरता संकटे कशी निर्माण करून घेतली आहेत याचा इशारा 'पद्मबंध' नामक कवितेत ग्रेसने दिला आहे .'घाटातुन घंटांचे घोर नाद थरथरती;' कवितेतील हा उल्लेख संध्याकाळी शंकराच्या मंदिरात वाजणाऱ्या घोर घंटानादाचा आहे व तो शंकराच्या तांडव नृत्याने सृष्टीचा संहार होण्याचा द्योतक आहे. पर्यावरण नाश म्हणजे सृष्टीचा संहारच.
"मध्यान्ह बावरे पक्षी." या प्रस्तुत कवितेतही माणसाने निसर्गाच्या विपरीत क्रियाकलापामुळे पर्यावरण संतुलन बिघडल्याने पक्ष्यांवर आणि ग्रामीण वस्तीवर किती विपरीत परिणाम झाला आहे हे दर्शविले आहे..
मध्यान्ह बावरे पक्षी
जे उधळुनी गेले अंबर
ते पक्षीच आता म्हणती
हे पंखहि माझे नश्वर ...
पारांची गावे तेह्वा
संध्येवर धूप उजळती
प्रत्येक घरातुन एक हलते
मिणमिणती एकट पणती ...
गाईंची गोरज धूळ
करुणाघन त्यांचे डोळे
बांधावर हंबर देती
वासरे मुकी वेल्हाळे ..
डोळ्यातिल स्वप्नतळांना
संध्येचा घुंगुरवाळा
क्षितिजावर तरिही झुलती
बगळ्यांच्या मोहनमाळा ...
माणसाने नैसर्गिक साधन संपत्तीचा विनाश केल्याने पक्षांना आपले भक्ष्य शोधण्यासाठी आणि आसर्‍यासाठी स्थळे शोधण्यासाठी निरंतर उडावे लागते. पूर्वी दुपारच्या वेड लावणाऱ्या उन्हातही आकाशात उडणारे पक्षी आता म्हणू लागले आहेत की आता आमच्या पंखांचा नाश होण्याची वेळ ही आली आहे.तसेच जी गावे पूर्वी संध्याकाळी गजबजलेली असायची ती आता ओसाड झाल्यासारखी वाटतात कारण वस्तीतील लोक गाव सोडून गेली आहेत.
पूर्वीच्या गावातली संध्याकाळी जंगलातून घरी येणाऱ्या गाईंची गोरज धूळ , आपल्या वासरांच्या भेटी साठी करुणेने भरलेले त्यांचे डोळे आणि तिची गोठ्यात बांधलेली हम्बरणारी सुंदर वासरे आठवतात.
माणसाच्या संहारक प्रवृतींचा पक्ष्यांना ही इशारा मिळाला आहे तरीही त्याची भीती न बाळगता त्यांचे निसर्गदत्त क्रियाकलाप चालूच आहेत आणि माणूस निसर्गाची पर्वा न करता विनाशाच्या मार्गावर जात आहे.

No comments:

Post a Comment