आज कोजागिरी पौर्णिमा.. जेष्ठ कवयित्री शान्ता शेळके ह्यांनी लिहिलेले ,सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायिलेले " तोच चंद्रमा नभात " हे भावगीत " ..
ह्या भावगीताशी निगडीत .. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कायमच्या कोरल्या गेलेल्या दोन आठवणी...... २३ वर्षापूर्वी इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना एके दिवशी मनात अशी कल्पना आली की मराठी साहित्यिक ,कवींनी निर्माण केलेल्या कलाकृती आपल्या समोर छापील स्वरूपात वाचावयास मिळतात. त्याच जर साहित्यिकाच्या हस्ताक्षरात संग्रहित केल्या तर.... आणि मग ह्या कल्पनेमुळेच मराठीतील सर्व जेष्ठ साहित्यिकांचा सहवास घडला.डिसेंबर ८९ च्या शेवटी शान्ताबाई शेळके ह्यांनी त्यांच्या घरी मला भेटायला बोलावले.. माझा हा छोटा अक्षर प्रयत्न आवर्जून पहिला.. कौतुक करत स्वतःच म्हणाल्या " तुम्हाला माझे एक स्वतःचे आवडते गीत लिहून देते.. तोच चंद्रमा नभात " .. आणि एका कोऱ्या कागदावर संपूर्ण भावगीत माझ्यासाठी त्यांच्या सुंदर टपोऱ्या अक्षरात लिहून दिले ..... माझ्यासाठी हा खूप भाग्याचा क्षण ... पण खरतर अजूनही काहीतरी लिहिले असावे माझ्या भाग्यात ... पुढे तीनच दिवसांनी १ जानेवारी १९९० रोजी ,सुधीर फडके ह्यांची भेट घडली. त्याकाळी : वीर सावरकर ह्या चित्रपटाच्या निर्मितीत गर्क असलेल्या सुधीर फडकेंनी अक्षर संग्रह पहिला .. कौतुक केले .. पण चटकन बाबुजींनी त्याचं अक्षर दिले नाही.. नंतर संध्याकाळी टिळक रोडवरच्या घरी पुन्हा भेटायला बोलावले... अक्षर मिळेल न मिळेल की केवळ सहीच मिळेल ह्याच विचारात असताना .. त्यानी स्वतः " तोच चंद्रमा नभात " च्याच दोन ओळी त्यांच्या हस्ताक्षरात लिहून भेट दिल्या... एखादे गीत आपण पुन्हा पुन्हा ऐकतो.. गुणगुणतो..भावनिक पातळीवरही एखादे गीताशी आपण कायमचे जोडले जातो... ह्या अजरामर गीताची निर्मिती करणाऱ्या ह्या दोन्ही महान व्यक्तींनी ते गीत माझ्यासाठी अक्षरबद्ध करून दिले तो क्षण माझ्यासाठी कायमचा कोजागिरी पौर्णीमेसारखा.. कधी कधी " दुग्धशर्करा योग " असा शब्दप्रयोग वापरला जातो... माझ्या आयुष्यातील हा " दुग्धशर्करा योग " आजच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्व मराठी साहित्य ,संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी ....
( कृपया ह्या दुर्मिळ हस्ताक्षरांचा व्यावसायिक उपयोगासाठी उपयोग करू नये.. ह्याची रसिकांनी नोंद घ्यावी )
No comments:
Post a Comment